Pune | शिवणेमध्ये भरधाव कारची बसला धडक; कारवरील ताबा सुटल्याने अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:38 AM2022-12-16T11:38:26+5:302022-12-16T11:40:19+5:30
रात्रीच्या वेळी रस्ता चुकल्यामुळे कार वळवत असताना अपघात...
शिवणे (पुणे) : शिवणे येथील ॲड मार्ट मॉल समोर गुरुवारी रात्री कार आणि बसची धडक झाली. या भीषण धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी रस्ता चुकल्यामुळे कार वळवत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटून बसला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापूरकर, हेड कॉन्स्टेबल अनिल मते त्वरित घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी पुढील कारवाई केली.
गणपती माथा ते उत्तमनगर या भागात रस्ता रुंदीकरण केल्यापासून येथे भरधाव वाहनांचे अनेक अपघात घडल्याचे निदर्शनात आले आहे. प्राथमिक शाळा, विद्यालय आणि नेहमीच गजबजलेल्या ह्या परिसरात कोठेही गतिरोधक नसल्याने वाहने गतीने चालवून अपघात होत आहेत. स्थानिकांनी अनेकवेळा गतिरोधक बसविण्यासाठी निवेदने दिली असली तरी देखील काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.