भारती विद्यापीठ परिसरात भरधाव टँकरची सहा, सात वाहनांना धडक; दोन व्यक्ती जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:40 AM2024-07-01T10:40:10+5:302024-07-01T10:40:31+5:30

धनकवडी ( पुणे ) : कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघातानंतर शहरातील अपघाताच्या घटना थांबेनाशा झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन ...

Rushing tanker collided with six, seven vehicles in Bharti University area; Two persons injured | भारती विद्यापीठ परिसरात भरधाव टँकरची सहा, सात वाहनांना धडक; दोन व्यक्ती जखमी

भारती विद्यापीठ परिसरात भरधाव टँकरची सहा, सात वाहनांना धडक; दोन व्यक्ती जखमी

धनकवडी (पुणे) : कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघातानंतर शहरातील अपघाताच्या घटना थांबेनाशा झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने टँकर चालवत दोन मुली आणि एका महिलेला उडवल्याची घटना ताजी असतानाच या पाठोपाठ रविवारी (दि.३०) रात्री ८ वाजता भारती विद्यापीठ परिसरात एका भरधाव टँकरने सात वाहनांना उडवले असून यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

दरम्यान पोलिस वारीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, मात्र प्रत्यक्षदर्शी व घटनेत जखमी झालेल्या रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार, तो रात्री साडेआठच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकाकडून रिक्षा घेऊन आंबेगाव पठार येथील निलगिरी झाडांच्या रस्त्यावरून प्राइड हायस्कूलकडे चालला होता. यावेळी समोरून भरधाव वेगात टँकर येत असल्याचे रिक्षा चालकाने पाहिले. टँकरचालक भरधाव वेगाने आडवा तिडवा कसाही टँकर चालवत होता. हे पाहून त्याने रिक्षा डाव्या बाजूला घेतली. तरीही टँकर चालकाने रिक्षाला ठोकर देऊन पुढे जाऊन सहा ते सात वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन कार आणि सहा दुचाकींचा समावेश होता. एका दुचाकीवरील दोन महिला गंभीर जखमी झाल्या तर एक तरुणही जखमी झाला. टँकर चालकाला तातडीने नागरिकांनी पकडले. त्याला बेदम चोप दिला. त्याने मद्यपान केल्याचे दिसत होते.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले, घटना घडली तेव्हा सर्व पोलिस वारीच्या बंदोबस्तात होते. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. तोवर नागरिकांनी टँकर चालकाला ताब्यात दिले होते. घटनेतील जखमी कोणत्या रुग्णालयात दाखल आहेत, याची आम्ही माहिती घेत आहोत.

Web Title: Rushing tanker collided with six, seven vehicles in Bharti University area; Two persons injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.