\Sʻॲमनोराʼ उच्चदाब वीजवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:09+5:302021-08-18T04:17:09+5:30
स्थलांतरास अखेर महापालिकेकडून स्थगिती लोकमत इम्पॅक्ट ʻॲमनोरा टाऊनशिपʼ परिसरातील अन्य सोसायट्या तसेच नागरिकांचा तीव्र विरोधाचा परिणाम दीपक मुनोत : ...
स्थलांतरास अखेर महापालिकेकडून स्थगिती
लोकमत इम्पॅक्ट
ʻॲमनोरा टाऊनशिपʼ परिसरातील अन्य सोसायट्या तसेच नागरिकांचा तीव्र विरोधाचा परिणाम
दीपक मुनोत : लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरातील ʻॲमनोराʼ टाउनशिप परिसरातील उच्चदाब वीजवाहिनी स्थलांतरास या परिसरातील सोसायट्यांनीही विरोध केल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या विषयाला सर्वप्रथम ʻलोकमतʼने वाचा फोडली होती. हडपसर भागातील ॲमनोरा टाउनशिप परिसरातील वृंदावन हाईटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीने याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
निवेदनात म्हटले आहे की, या परिसरातील अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या स्थलांतरास महापालिकेच्या पथ विभागाकडून मंजुरी दिली आहे. या वाहिन्या, मगरपट्टा रस्ता ते साडेसतरा नळी रस्ता येथील पाईपलाईन रस्ता येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी, खोदकामाला परवानगी दिली आहे. परवानगी देताना काही अटी टाकण्यात आल्या होत्या. त्यात दोन रस्ते एकत्र येतील तेथे मोनोपोल उभारू नये, अशी अट टाकली होती. मात्र, या परिसरात पाईपलाईन रस्ता आणि नियोजित १२ मीटर रुंदीचा रस्ता जेथे एकत्र येतात तेथेच मोनोपोल उभारण्याचे काम सुरू आहे. तसे झाल्यास या परिसरातील वाहतुकीला अडथळा येईल, तरी याबाबत तातडीने निर्णय घेऊन मोनोपोलची जागा बदलावी, अशीही मागणी करण्यात आली होती. ५ एप्रिल २०२१ रोजी केलेल्या या मागणीची दखल पुणे महापालिकेने तब्बल तीन/ चार महिन्यांनी घेतली आणि काम थांबविण्याचे आदेश दिले. दरम्यान, गत सप्ताहात, बुधवारी कंपनीने मोनोपोलसाठी तयार केलेले फाऊंडेशन जेसीबीद्वारे काढून टाकल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी सुस्कारा टाकला आहे.
........................................
उच्चदाब वीजवाहिन्यांच्या स्थलांतरास विरोध करणारी मागणी काही सोसायट्या आणि व्यक्तिगत पातळीवर आमच्याकडे आली होती. सामूहिक पातळीवर होत असलेल्या मागणीची दखल घेऊन आम्ही संबंधितांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
- राजेंद्र अर्धापुरे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका.
..........................,.