एस. पी. महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात
By नितीश गोवंडे | Updated: July 7, 2024 17:44 IST2024-07-07T17:43:00+5:302024-07-07T17:44:17+5:30
एस. पी. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली

एस. पी. महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात
पुणे : सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान, तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्वरित आग आटोक्यात आली. आग लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
एस. पी. महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठ्यासाठी वापरात असलेल्या सीटी मीटरने रविवारी (दि. ७) सकाळी पेट घेतला. मीटरने पेट घेताच मोठा आवाज झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणली. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. महावितरणच्या पर्वती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज मीटरची, तसेच विद्युत यंत्रणेची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातील जवान सागर देवकुळे, महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.
जनजागृतीमुळे गंभीर दुर्घटना रोखण्यास मदत..
अग्निशमन दलाकडून शहरातील महाविद्यालय, माॅल, शाळा, रुग्णालयांच्या परिसरात आग लागल्यास करायच्या उपाययोजना, अग्निरोधक उपकरणांचा वापराबाबत माहितीपर व्याख्यान, तसेच प्रात्यक्षिकांचे नियमित आयोजन केले जाते. जगजागृतीमुळे गंभीर स्वरूपाच्या घटना रोखण्यास मदत झाली आहे. या अस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एस. पी. महाविद्यालयातील आग आटोक्यात आणण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली.