सासवडची कचराकोंडी सुरूच
By admin | Published: September 2, 2016 05:36 AM2016-09-02T05:36:14+5:302016-09-02T05:36:14+5:30
सासवड नगर परिषदेचा कचरा प्रकल्प कुंभारवळण येथे आहे. या प्रकल्पामध्ये कचरा नेण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. हरित न्यायालयाकडेही याबाबत दाद मागितली
सासवड : सासवड नगर परिषदेचा कचरा प्रकल्प कुंभारवळण येथे आहे. या प्रकल्पामध्ये कचरा नेण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. हरित न्यायालयाकडेही याबाबत दाद मागितली आहे. असे असताना नगर परिषदेने ३१ आॅगस्टपर्यंत कचरा टाकू नये, असा न्यायालयाचा आदेश होता. दि. ३१ रोजी हरित न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रकल्पाची पाहणी करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज (दि. १ सप्टेंबर) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
नगरपालिकेने कुंभारवळण हद्दीत घन कचरा प्रकल्प उभारला आहे. तेथे कचरा टाकण्यास न्यायालयाने मनाई केली. ३१ आॅगस्टपर्यंत नगर परिषदेने पूर्तता करणे आवश्यक होते. म्हणून १ सप्टेंबरपर्यंत नागरिक थांबले होते. आता कचरा टाकू देणार नाही, असे निवेदनही नगरपालिकेला ८ दिवसांपूर्वी दिले होते.
सासवड येथील आंदोलकांबरोबर नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक यांनी चर्चा केली. ५ सप्टेंबरपर्यंत नगरपालिकेला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मुदत द्यावी. तोपर्यंत आंदोलन थांबवावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती माजी नगरसेवक मारुती लांडगे व सचिन भोंडे यांनी दिली. (वार्ताहर)