हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:05+5:302021-08-27T04:16:05+5:30
अर्धन्यायिक प्रकरणे चालवताना कायदेशीर तरतुदी न पाळणे, काही प्रकरणांमध्ये आव्हानित केलेल्या फेरफार व्यतिरिक्त अन्य फेरफाराविरुद्ध आदेश पारित करणे, शासकीय ...
अर्धन्यायिक प्रकरणे चालवताना कायदेशीर तरतुदी न पाळणे, काही प्रकरणांमध्ये आव्हानित केलेल्या फेरफार व्यतिरिक्त अन्य फेरफाराविरुद्ध आदेश पारित करणे, शासकीय कामात कर्तव्यपरायणता न ठेवणे, शासकीय कर्तव्ये व जबाबदारी न पाळणे, सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव बारवकर यांची सांगली येथील उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ६ येथील शंकरराव जाधव यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदली झाली आहे.
हवेलीचे प्रांताधिकारी बारवकर यांनी निर्णय दिलेल्या २ हजार ५१२ प्रकरणांपैकी ७९८ प्रकरणांची अंशतः तपासणी झाली असता ४६५ प्रकरणांत नोटीस न बजावता कलम २३२(२) नुसार प्रकरणे कामकाजातून काढून टाकली आहेत. या कार्यपद्धतीमुळे पक्षकारांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. असा स्वयंस्पष्ट अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनास पाठवला होता. त्यानुसार शासनाने हवेलीचे प्रांताधिकारी बारवकर यांची तडकाफडकी बदली केली आहे.