सचिन लांडे याचे यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:49+5:302021-09-26T04:11:49+5:30
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील प्रसिद्ध देवस्थान कुकडेश्वर जवळील शिरोली या गावातील रहिवाशी असणारा सचिन सध्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने वाई ...
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील प्रसिद्ध देवस्थान कुकडेश्वर जवळील शिरोली या गावातील रहिवाशी असणारा सचिन सध्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने वाई येथे वास्तव्यास आहे. संबंध पुणे जिल्ह्यात आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांनी सध्या यूपीएससी परीक्षेत यश मिळविले, त्यामध्ये सचिन यांचा समावेश झाला आहे.
सचिनचे वडील देवराम लांडे हे वाई येथील शासकीय मुद्रणालयामध्ये कार्यरत आहेत. लहानपणी सचिनची प्रचंड बुद्धिमत्ता पाहून माजी उपजिल्हाधिकारी श्री दादाभाऊ सयाजी जोशी यांनी सचिनला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याचा सल्ला दिला होता. तसेच ते त्याला वेळोवेळी मार्गदर्शनही करत होते. सचिनच्या यशात त्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. यापूर्वी एमपीएससीमार्फत सचिनची निवड नायब तहसीलदारपदी झाली होती. मागील अनेक वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे आदिवासी तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. जुन्नर तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून सचिनचे कौतुक केले जात आहे.