धाक दाखवून वाळूचा ट्रक पळविला

By Admin | Published: October 26, 2016 05:44 AM2016-10-26T05:44:16+5:302016-10-26T05:44:16+5:30

यवत विश्रामगृहात बंदोबस्तासाठी असलेल्या तलाठी व झिरो पोलीस यांना रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून एक वाळूचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला आहे.

Sack truck overwhelmed | धाक दाखवून वाळूचा ट्रक पळविला

धाक दाखवून वाळूचा ट्रक पळविला

googlenewsNext

यवत : यवत विश्रामगृहात बंदोबस्तासाठी असलेल्या तलाठी व झिरो पोलीस यांना रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून एक वाळूचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला आहे. ही घटना आज (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, या वेळी चोरांना उपस्थित तलाठ्याने चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करून गाडीखाली घेऊन मारून टाकण्याची धमकीदेखील दिली.
पुणे-सोलापूर महामार्गावर चोरट्या वाळूच्या वाहातुकीवर दौंड महसूल विभागाने धडक कारवाई करून तब्बल २५ वाळूचे ट्रक पकडले होते. पुरंदर महसूल विभागाचे प्रांताधिकारी संजय असवले, दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
पकडण्यात आलेले ट्रक यवत येथील सार्वजानिक बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहातील आवारात ठेवण्यात आले होते. शासकीय विश्रामगृहाला कुंपणभिंत व लोखंडी गेट आहे. तसेच आवारात मोठे मैदान असल्याने महामार्गावर पकडण्यात आलेले ट्रक सुरक्षेच्या दृष्टीने येथेच ठेवले जातात.
काल (दि. २४) रात्रीच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात बोरीपार्धी येथील तलाठी शंकर दिवेकर, एक झिरो पोलीस व शासकीय विश्रामगृहातील शिपाई ट्रकवर बंदोबस्त ठेवण्यासाठी होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी कटावणीच्या साहाय्याने लोखंडी गेटचे कुलूप तोडल्याचा आवाज झाल्याने तलाठी शंकर दिवेकर सावध झाले त्यांनी कोण आहे? असे विचारले असता पुढील चोराने तलवारी घेऊन या, असा इतरांना आवाज देत विश्रामगृहाच्या आवारात प्रवेश केला. दिवेकर यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाजूच्या कट्ट्यावर पकडून धक्काबुक्की करीत मध्ये आला तर गाडीखाली घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
या वेळी इतर चोरांनी एक ट्रक (एमएच १२, बीसी ३९८१) सुरू करून वेगात बाहेर घेऊन गेले. तसेच सर्व चोर पुणे-सोलापूर महामार्गाने फरारी झाले. या थरारक घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत दिवेकर यांनी दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांना याबाबत माहिती दिली व यानंतर यवत पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तलाठी शंकर दिवेकर यांनी फिर्याद दिल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

ट्रकचे नंबर बदलले जात असल्याने तपास कठीण...
चोरटी वाळू वाहतूक करताना एखादा वाळूचा ट्रक पकडल्यास या वाहनातील वाळूवर प्रतिब्रास शासनाच्या नियमाप्रमाणे दंड आकारला जाण्याबरोबरच संबंधित वाहनातून परत चोरटी वाळू वाहतूक केल्यास ते वाहन कायमस्वरूपी शासनाकडून जप्त करण्यात येईल, असा बाँड लिहून घेतला जातो. यामुळे सद्य:स्थितीत चोरटी वाळूवाहतूक करणारे बहुतांश वाहनचालक बनावट नंबर टाकून चोरटी वाळूवाहतूक करतात. यामुळे परत वाहन पकडले गेल्यास केवळ दंड भरून सोडविता येते, तसेच वाहन जप्त होण्याची भीती राहत नाही. परंतु यामुळे आता यवतमधून पळविण्यात आलेला ट्रकचा नंबर खरा असेल, याची शाश्वती नाही. याचा मोठा अडथळा पोलीस तपासात येणार आहे.

Web Title: Sack truck overwhelmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.