शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पाेर्टल दाेन तास अचानक बंद
By प्रशांत बिडवे | Published: February 7, 2024 04:59 PM2024-02-07T16:59:13+5:302024-02-07T16:59:21+5:30
गुरूवार दि. ८ पासून प्राधान्यक्रम लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असल्याने विदयार्थी चिंतेत
पुणे : राज्यात पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. साेमवार दि. ५ पासून पवित्र पाेर्टलवर रीक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर टेट परीक्षा उत्तीर्ण तसेच स्व- प्रमाणपत्र प्रमाणित केलेल्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्यास सुरूवात केली. दरम्यान, बुधवारी अचानक पवित्र पाेर्टल दुपारी ४ ते ६ या कालावधीत देखभाल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे.
राज्यात सुमारे सव्वा दाेन लाख उमेदवारांनी टेट २०२२ परीक्षा दिली हाेती. त्यातील १ लाख ६३ हजार उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रे प्रमाणित करून घेतले आहेत. पवित्र पाेर्टलवर साेमवारी दि. ५ राेजी सायंकाळी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत ५७ हजार ६२९ उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते. शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टल दुरूस्ती (मेंटनन्स) सुरू असून दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते सहा या उपलब्ध राहणार नाही, याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, गुरूवार दि. ८ पासून प्राधान्यक्रम लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. त्यामुळे विदयार्थी चिंतीत झाले आहेत. बुधवार दि. ७ राेजी लाॅगीन करणे, इंटरनेट बंद पडणे आदी काही तांत्रिक अडचणी जाणवत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असताना अचानक दाेन तास पवित्र पाेर्टल का बंद करण्यात आले? असाप्रश्नही उमेदवारांकडून विचारला जात आहे.