नरबळी अन् ५० लाख द्या अन्यथा पती, मुलाचा मृत्यू होईल; भीती घालणाऱ्या मांत्रिकासह ५ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:26 PM2024-01-19T13:26:00+5:302024-01-19T13:28:13+5:30
चंदननगर येथील चव्हाण नगर परिसरात हा प्रकार घडला...
- किरण शिंदे
पुणे : जादूटोणा आणि अघोरी विद्या करून जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल आणि आजारी असलेल्या मुलाला बरे करण्यासाठी आधीच ३५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर आणखी ५० लाख रुपये आणि नरबळी द्यावा लागेल असे म्हणत भीती घालणाऱ्या मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर येथील चव्हाण नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारुदत्त संजय मारणे ( वय ३१, निपाणी वस्ती आंबेगाव), पुनम घनश्याम कोहंडे (वय ३८, कर्वे नगर), नीलम राहुल जाधव (वय ३५, कर्वेनगर), देविका अमित जुन्नलकर (वय ३०, उत्सव मंगल कार्यालयामागे कोथरूड) आणि संतोष मारुती येनपुरे (वय ४५, राग गणेश पुरी सोसायटी वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. चाळीस वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल आणि आजारी असतो. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलाची आजारपणातून सुटका करण्यासाठी आणि घरातील अडीअडचणी जादूटोण्याच्या साह्याने सोडून असं म्हणत फिर्यादींचा विश्वास संपादन केला. जादूटोणा करून मंत्राच्या साह्याने भूतपिषाच्या सहाय्याने मुलाला बरे करतो असे म्हणत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये घेतले. २०१६ असून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
दरम्यान मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला आणि आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच एक नरबळी द्यावा लागेल असेही सांगितले. असे नाही केले तर तुमच्या मुलाचा व पतीचा मृत्यू होईल, घराचा नायनाट होईल अशी भीती घातली. या सर्व प्रकाराला घाबरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.