त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र : केशव प्रथमवीर; गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:12 PM2017-12-16T13:12:52+5:302017-12-16T13:16:12+5:30
त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली.
पुणे : त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली. इतिहासभूषण श्री. द. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ल. का मोहरीर, गणितज्ज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
प्रथमवीर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती ही सगळ्यात जुनी संस्कृती आहे. त्यातील भारतीय संस्कृतीतील ऋग्वेद हा सगळ्यात जुना लिखित ग्रंथ आहे. म्हणजे त्याआधीही इथे भारतीय संस्कृती नांदत होती. या संस्कृतीचे त्याग हेच मूळ सूत्र आहे. संग्रह करणे, साठा करणे या गोष्टी पाश्चात्य संस्कृतीत दिसून येतात. पाश्चात्य संस्कृतीच्या या गोष्टी सध्या आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. त्याग हे मूल्य त्यामुळे हरवत चालले आहे. संस्कृतीतील हे मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर शालेय शिक्षण पद्धतीत त्याग हे मूल्य शिकवण्यावर भर द्यायला हवा.’
कामत म्हणाले, ‘जगाच्या मूलस्थानी भारत होता; आजही आहे. जगात अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि लोपल्या. पण भारतीय संस्कृती आजही टिकून आहे. कारण, भारतीयांनी इतरत्र जाऊन अन्य संस्कृतीची नासधूस न करता आपली संस्कृती जोपासली. भारताबाहेरील जवळपास १५ देशांमध्ये भारतीय संस्कृतीची पाळेमुळे पहायला मिळतात. भारतीय तत्त्वज्ञान, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आचार यामुळे भारतीय जगाशी जोडला गेला. जिथे भारतीय माणूस गेला, तिथे त्याने तिथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.’
कार्यक्रमात डॉ. ल. का. मोहरीर, डॉ. भालचंद्र कापरेकर आणि प्रा. मुक्ता गरसोळे यांनी श्री. द. कुलकर्णी यांच्या इतिहासविषयक खंडांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.