बकरी ईदला रक्तदान करून त्यागाची कुर्बानी! मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 08:58 AM2024-06-17T08:58:03+5:302024-06-17T08:58:55+5:30
रक्तदान, अवयवदान, मरणोत्तर देहदानाचा संकल्प आणि शैक्षणिक प्रायोजकत्व घेऊन बकरी ईद साजरी होत आहे....
पुणे :बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यात येते. त्याग, बलिदान आणि समाजभान यांची शिकवण देणारी ही ईद मुस्लिम जगतासाठी केवळ प्राण्यांची आहुती देण्यातच स्थिरावली आहे. यापेक्षा वेगळा उपक्रम राबविण्याचा निर्धार मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून केला आहे. त्यांच्याकडून रक्तदान, अवयवदान, मरणोत्तर देहदानाचा संकल्प आणि शैक्षणिक प्रायोजकत्व घेऊन बकरी ईद साजरी होत आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे सोमवारी (दि. १७) बकरी ईदनिमित्त हे उपक्रम बॅ. नाथ पै सभागृह, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा येथे होणार आहे. या वेळी साने गुरुजी यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे अभिवादन करण्यात येईल. बकरी ईद अधिक समाजाभिमुख, मानवताभिमुख व्हावी यासाठी मंडळातर्फे गेल्या १५ वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान अभियान राबविण्यात येते.
पुण्याबाहेरदेखील राज्यभरात रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी दिली. प्राण्यांच्या कुर्बानीसाठी होणारा खर्च टाळून समाजात आधुनिक शिक्षणास चालना देण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.