ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 07:31 AM2018-03-13T07:31:42+5:302018-03-14T05:53:10+5:30

'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन करणारे एकपात्री क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी  सदानंद चांदेकर यांचे डोंबिवलीत निधन झाले.

Sadanand Chandekar passed away | ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन

Next

पुणे : ‘हसरी उठाठेव’ या एकपात्री कार्यक्रमातून रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन केलेले ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे डोंबिवलीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा व सून असा परिवार आहे.
चांदेकर पुण्यात एकटेच राहात होते. काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राहात असलेल्या मुलाकडे ते गेले होते. तिथेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी टिळक स्मारक मंदिर येथील नाट्य परिषदेच्या आवारात ठेवण्यात आले होते. नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, मोहन कुलकर्णी, सुधीर गाडगीळ, विजय कोटस्थाने, राहुल भालेराव, संतोष चोरडिया, भावना प्रमादे, मंजुषा जोशी आदी एकपात्री रंगभूमीवरील कलाकारांनी अंत्यदर्शन घेतले. सकाळी ११च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदेकर हे मॉडर्न महाविद्यालयात कलाशिक्षक होते. झपाटा आॅर्केस्ट्रासह रंगभूमी, चित्रपटांमध्ये लेटरिंग डिझाइनचे काम त्यांनी केले. त्यानंतर ते व्यावसायिक एकपात्रीमध्ये आले. स्वलिखित, स्वनिर्मित अशा ‘हसरी उठाठेव’ या विनोदी नाट्यातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांचे मनोरंजन केले. ‘शहर, तालुका गावपातळीवर’ या कार्यक्रमाचे त्यांनी १५००पेक्षा अधिक प्रयोग केले. मुंबई, पुणेसारख्या नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड लागणारा त्यांचा एकपात्री कार्यक्रम होता. महानगरपालिकेतर्फे ‘पुण्याचा अभिमान’ म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
मुंबई येथे झालेल्या एकपात्री संमेलनात ‘हास्यसम्राट’ किताब त्यांना देण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आणि बालगंधर्व पुरस्काराचे ते मानकरी ठरले. ‘आम्ही दिवटे’ हे आत्मकथन प्रसिद्ध आहे.

Web Title: Sadanand Chandekar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.