सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:24 AM2018-02-01T02:24:29+5:302018-02-01T02:25:15+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम जाणवला.

 Sadananda yalakot! Shedding of coconut and bhanda on the temple of the devotees | सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण

सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण

googlenewsNext

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम जाणवला.
माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरीत शिखर काठ्यांची मोठी यात्रा भरते, राज्यभरातील भाविक आपआपल्या प्रासादिक शिखर काठ्यांसह जेजुरीला येऊन देवदर्शन घेत असतात. कोकणातील कोळी बांधवही आपआपल्या पालख्या घेऊन जेजुरीस येतात. या वर्षी जेजुरी कोळी बांधवांसह शिखरी काठ्यांच्यासमवेत आलेल्या भाविकांची जेजुरीत कालपासून मोठी गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर राज्यभरातून इतरही भाविक देवदर्शनासाठी जेजुरीत आलेले आहेत. येथील ऐतिहासिक चिंचबागेत राज्यभरातून आलेले भाविक तंबू, राहुट्या उभारून उतरलेले आहेत.
उद्या (दि. १) शिखरी काठ्यांची देवभेटीचा सोहळा रंगणार आहे. हा सोहळा नेहमीच वादग्रस्त राहिल्याने पोलिसांनीच सोहळ्यातील मानकरी संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे यांना एकत्र बसवून वर्षाआड देवभेटीचा प्रथम मान देण्याचा तोडगा काढला असल्याने यंदा सकाळी ९ ते ११ या वेळेत सुपेकर खैरे यांची मानाची शिखरकाठी सोबतच्या प्रासादिक शिखरकाठ्यांसह गडावर जाऊन देवभेट घेणार आहेत. तर दुपारी २ ते ५ या वेळेत संगमनेरकर होलमांची मानाची शिखरकाठी देवभेटीला जाणार आहे.

आज सायंकाळी कोळी बांधवांच्या पालख्यांनी जेजुरी गडावर जाऊन देवभेट घेतली. या वेळी ऐतिहासिक चिंचबाग ते खंडोबा गडापर्यंत भाविकांनी पालख्यांची मिरवणूक काढली होती. रात्री उशिरापर्यंत गडावर कोळी बांधवांनी देवदर्शन घेतले.

निमगाव खंडोबाचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
दावडी : निमगाव (ता. खेड) येथील माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त सदानंदाचा येळकट येळकोट करीत भंडार खोबºयाची उधळण करीत १ लाखापेक्षा अधिक भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.
निमगाव येथे माघ पौर्णिमेनिमित्त सकाळी अभिषेक, आरती, देवाची शिवथी, देवाचे लग्न, दहा वाजता खंडेरायाची शाही मिरवणूक, मानांच्या काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा, देवाला गोड नैवेद्य विधिवत पूजा करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
मंदिराच्या शिखराला मानाच्या काठ्या निगडेकर, संगमनेरकर, नेहरकर यांनी मंदिराच्या भोवती काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. रात्रीपासून भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभर खेड तालुक्यासह उत्तर महाराष्ट्र पुणे, अहमदनगर, ठाणे, मुंबई येथून भाविक दर्शनासाठी आले होते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टने आत व बाहेर पडण्याचे दोन मार्ग ठेवले होते. तसेच भाविकांना सहजतेने दर्शन घेता यावे म्हणून देवाच्या पादुका बाहेर ठेवण्यात आल्या होत्या.

बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने नवसाचे बैलगाडे पळाले नाहीत. घाटात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, सरपंच बबनराव शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, साहेबराव शिंदे, कैलास शिंदे, माणिक शिंदे, महेश शिंदे, बबनराव शिंदे, संभाजी राऊत, मनोहर गोरगल्ले, मोहनराव शिंदे यांनी केले.
या यात्रेत प्रसाद म्हणून सदानंदाचा यळकोट असे म्हणून खोबरं उधळलं जातं. त्यामुळे यात्रेत खोबरे आणि भंडाºयाची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. तसेच मंदिर परिसरात शेव, रेवडी, हॉटेल, खेळणी यांची दुकाने थाटली होती.

अडीच लाख भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
सावरगाव : माघ पौर्णिमेनिमित्ताने कुलस्वामी देवस्थान वडज खंडोबायात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे जवळपास अडीच लाख भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. आज दि. ३१ रोजी सकाळी देवाची पालखी निघून दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सकाळपासूनच देवस्थान परिसरात होती. पहाटे चारपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
माघ पौर्णिमा हा दिवस देवस्थांनामार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. उत्सवापूर्वी आठ दिवस कीर्तनाचा व कार्यक्रम रंगलेला असतो, त्याचबरोबर भाविकांना या आठ दिवसांच्या काळात महाप्रसादाची सोया देवस्थांनामार्फत करण्यात आली होती. या सप्ताहाची सांगता या माघ पौर्णिमेच्या दिवशी होते. भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. संपूर्ण जिल्ह्यातून भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी वडज या ठिकाणी येतात.

Web Title:  Sadananda yalakot! Shedding of coconut and bhanda on the temple of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.