अरे देवा, भेदरलेल्या तरुणीला पोलीस चौकीत कडी लावून बसावं लागलं!
By प्रमोद सरवळे | Published: June 27, 2023 07:07 PM2023-06-27T19:07:49+5:302023-06-27T19:34:13+5:30
सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने हल्ला
पुणे : आज भरदिवसा पुण्यात एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केले. त्यामध्ये ही तरुणी जखमी झाली आहे. ज्यावेळी त्या तरुणीवर हल्ला झाला त्यावेळी रस्त्यावरील काही लोक मधे आले म्हणून ती तरुणी वाचू शकली. या घटनेनंतर त्या तरुणीची भेदरलेली अवस्था पाहून तिला काहीजण जवळील पेरूगेट पोलीस चौकीत घेऊन गेले. पण दुर्दैव हे की त्या चौकीत एकही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी नव्हता. त्यामुळे त्या मुलीची अवस्था पाहून आणि घटनेचे गांभीर्य पाहून तरुणीसोबत असणाऱ्यांनी चौकीत आतून कडी लावून घेतली. जर पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील पोलीस चौकीत असे पोलिस कर्मचारी नसतील तर सामान्यांनी अडचणीच्यावेळी जायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्यावेळी जखमी तरुणीला पोलीस चौकीत आणले त्यानंतर तब्बल अर्धा तासाने पोलीस तिथे आले नंतर कडी उघडली असे तिच्यासोबत असणाऱ्यांनी सांगितले. याबद्दल पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला घटनेनंतर तिथल्या काही लोकांनी फोन केले, त्यानंतर ५ ते ७ मिनिटांत पोलिस कर्मचारी चौकीजवळ पोहचले. ज्या ठिकाणी हल्ला झाला होता तिथून पेरुगेट पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे.
"आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले"
मी दुकानामध्ये काम करत होतो. माझं लक्ष अचानक एका मुलीकडे गेलं. ती मुलगी पेरुगेट पोलिस चौकीच्या दिशेने पळत आली. तिच्या मागे एक मुलगा पळत आला. त्याच्या हातात कोयता होता. ती मुलगी पळत असताना अंबिका स्वीट होम जवळ पाय घसरून पडली. त्याने त्या मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हात आडवा केला. तर कोयत्याचा वार हातावर झाला. हे दिसताक्षणी मी धावत तिथे गेलो. माझ्या सोबत एक मुलगा होता. त्याने त्या मुलाला पकडले. तोपर्यंत लोकांचा जमाव आला. लोकांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. इतका मार खाऊन सुद्धा तो उठून तिला मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्या मुलीला धीर देत पोलिस चौकीमध्ये नेले. तेथे कोणी नव्हते. मग आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले. काही वेळाने पोलिस तेथे पोहचले, असं प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.
घटनेनंतर पुणे शहरात खळबळ-
याबाबत २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सदाशिव पेठेतील स्वाद हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहुल हंडोरे याने खून केल्याची घटना नुकतीच घडली. राहुलने दर्शनाकडे विवाहाबाबत विचारणा केली होती. दर्शनाने त्याला झिडकारले होते. त्यानंतर त्याने दर्शनाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने राजगड किल्ला परिसरात नेऊन खून केल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. त्यानंतर सदाशिव पेठेत मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मंडई पोलीस चौकी आणि पेरुगेट पोलीस चौकीसाठी मनुष्यबळ कमी आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मार्शल आणि अंमलदार मंडई पोलीस चोकीकडे होते. घटनेनंतर ५ ते ७ मिनिटांत पोलीस तिथे पोहचले होते.
-दादा गायकवाड (पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग विश्रामबाग पोलीस स्टेशन)