SPPU| पुणे विद्यापीठाच्या 'जीवनसाधना गौरव' पुरस्काराची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:18 PM2022-02-09T15:18:40+5:302022-02-09T15:20:37+5:30
10 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या जीवनसाधना गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदा भारती ठाकूर, डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. मो. स. गोसावी, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, ज्योती देशमुख, रमेश आप्पा थोरात, प्रमोद कांबळे, आनंद देशमुख, डॉ. अरुण अडसूळ यांची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी नोंद झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 73 व्या वर्धापनानिमित्त येत्या 10 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मध्यप्रदेशातील भारती ठाकूर, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, प्रमोद कांबळे यांना तर आयुर्वेदातील कार्याबद्दल डॉ. सदानंद सरदेशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. मो. स. गोसावी, डॉ. अरुण अडसूळ यांची या पुरस्कासाठी निवड केली आहे.
तसेच सामाजिक कार्याबद्दल ज्योती देशमुख यांची तर सामाजिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल रमेश आप्पा थोरात यांची आणि सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. आनंद देशमुख यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.