'साधू नटवरभाई'ने घातला पुण्याच्या तरुणाला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:29 PM2022-06-15T12:29:38+5:302022-06-15T12:30:02+5:30
पुण्याच्या तरुणाला सायबर गंडा...
पुणे : अमिताभ बच्चन यांनी मि. नटवरलालमध्ये चोरट्याची भूमिका केली होती. त्यात त्यांनी अफलातून युक्त्या लढवत चोऱ्या केल्या. तेव्हापासून बड्या चाेरट्याला ‘मि. नटवरलाल’ म्हटले जाऊ लागले. असाच एक आधुनिक नटरवरलालने पुण्याच्या तरुणाला सायबर गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या चाेरट्याचे नाव साधू नटवरभाई आहे.
हा चाेरटा इतरांच्या मदतीने तरुणाला मोबाईल पाठवून त्यात सीम कार्ड टाकण्यास सांगताे. मोबाईलमधील ॲपमध्ये माहिती भरायला सांगून त्याच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करताे. असाच प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी बालेवाडी येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साधू नटवरभाई गोविंदभाई (रा. अहमदाबाद), रेश्मा मनोहर सरवदे (रा. वडवणी, जि. बीड) वापरकर्ता प्रदीप कैलास नरवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना साधू नटवरभाई यांचा फोन आला. सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डची मुदत संपत आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सिटी बँक डायर्नस क्लब इंटरनॅशनल कार्ड मिळत आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना रेडमी कंपनीचा मोबाईल पाठविला. त्यात त्यांचे सिमकार्ड टाकायला सांगितले. मोबाईलमध्ये असलेल्या डॉट सिक्युअर ॲपमध्ये फिर्यादी यांचा मोबाईल नंबर टाकण्यास सांगून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितली. त्यानुसार क्रेडिट कार्डची माहिती भरताच सायबर चोरट्यांनी ११ वेळा ट्रान्झेक्शन करून त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक केली. फिर्यादी यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात केली होती. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करून सायबर चोरट्यांची नावे निष्पन्न केली असून, चतु:श्रुंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड अधिक तपास करीत आहे.