साधू वासवानी चौकातील ‘पार्किंग बार’वर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:58 IST2025-03-05T14:45:10+5:302025-03-05T14:58:06+5:30
परवाना असलेल्या बारमध्ये जर अनियमितता आढळली, तर सदर बारला विभागीय कारवाईअंतर्गत नोटीस दिली जाते.

साधू वासवानी चौकातील ‘पार्किंग बार’वर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुणे: साधू वासवानी चौकातील परमार चेंबर व्यावसायिक आस्थापनात पार्किंगमध्ये सुरू असलेल्या निर्माण फॅमिली रेस्टॉरंट अँड बार या अनधिकृत बारला उत्पादन शुल्क विभागाने नोटीस देऊन विभागीय कारवाईही केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी (दि.४) प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
कारवाई वेळी आम्ही पार्किंगमध्ये दारू पिण्यास देतच नाही, असे अजब उत्तर बार चालकाने अधिकाऱ्यांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभाग हा केवळ परवानगी देण्याचं काम करतो. परवाना असलेल्या बारमध्ये जर अनियमितता आढळली, तर सदर बारला विभागीय कारवाईअंतर्गत नोटीस दिली जाते.
त्याचा अहवाल आम्ही अधीक्षकांना देतो. त्यांनतर अधीक्षकांचा शेरा लिहून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतात. त्यांनतर परवाना रद्द करायचा की नाही, हा सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा असतो; परंतु प्रत्यक्ष या कारवाईचा काय परिणाम होतो. त्यांना किती अधिकार आहेत, याबाबत अधिकारी माहिती देऊ शकलेले नाही.
हा विषय महापालिकेचा
बार चालकाने पार्किंगमध्ये बांधकाम केले असले, तर हा विषय महापालिकेचा आहे. त्यांनी त्यावर कारवाई करावी. निर्माण बारविषयी खूप वर्षांपूर्वी परवानगी दिली आहे. ही परवानगी मुख्य दुकानांना दिली आहे.
आम्ही संबंधित बारवर विभागीय कारवाई केली आहे. त्यासंदर्भात अहवाल अधीक्षकांना पाठवला आहे आणि संबंधित बार मालकाला नोटीसही दिली आहे. - वसंत कौशेडीकर, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग