रस्त्यांचे होणार ‘सेफ्टी आॅडीट’ : अपघात मुक्तीसाठी पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:43 PM2018-04-11T15:43:45+5:302018-04-11T15:43:45+5:30
महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले.
स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
पुणे: रस्त्यांची वाहन क्षमता वाढवितानाच अपघातमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या तब्बल ८०० किलो मीटर रस्त्यांचे ‘सेफ्टी आॅडीट’ करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले की, यापूर्वी रस्त्यांचे आॅडीट केलेल्या कंपनीलाच दुस-या टप्प्यातील रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या कंपनीला प्रती किलोमीटरसाठी २४ हजार ९०० रुपये देण्यात आले होते. आता देखील याच दरानुसार पुढील काम देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला २ कोटी ४९ लाख रुपये देण्याच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे . यामध्ये संबंधित कंपनीने दुस-या टप्प्यातील कामासाठी ५ टक्के वाढीव रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु, स्थायी समितीच्या वतीने ही मागणी फेटाळून लावली असल्याचे मुळीक यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले. या आॅडीटमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांमध्ये आवश्यक त्या तरतूदीनुसार, वेळोवेळी बदल केले जात आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने पुढच्या टप्प्यात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदी असलेल्या सुमारे १ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी आणखी ८०० किलोमीटर रस्त्याचे सेफ्टी आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा न काढता सध्या नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनी बरोबरच महापालिकेचा पाच वर्षांचा करार असल्याने तसेच झालेल्या कामाबाबत महापालिका आयुक्तांनी आणखी पुन्हा काम देण्यास सहमती दर्शविल्याने या पूर्वीच काम केलेल्या सल्लागाराच्या माध्यमातून हे वाढीव काम करण्याचा प्रस्ताव पथ विभागाने स्थायी समिती समोर ठेवला आहे. या प्रस्तावाला समितीने अखेर मान्यता दिली आहे.