भाविकांची सुरक्षा ऐरणीवर
By admin | Published: January 2, 2015 11:22 PM2015-01-02T23:22:08+5:302015-01-02T23:22:08+5:30
येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी व गुरुवारी किमान एक ते सव्वा लाख भाविक येत आहेत.
जेजुरी : येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी व गुरुवारी किमान एक ते सव्वा लाख भाविक येत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत देवसंस्थानकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही.
गर्दीच्या वेळी पोलीस प्रशासनाला धाव घेत बंदोबस्त ठेवावा लागतो. रस्ते वाहतूकव्यवस्था व दैनंदिन कामे याचा प्रचंड ताण पोलिसांवर पडत आहे. जेजुरी पोलीस ठाण्यांतर्गत नीरा, वाल्हा, जेजुरी या प्रमुख गावांसह ३९ ते ४२ गावे येतात व तीन अधिकारी व ३७ पोलीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. यातील अधिकाधिककर्मचारी बंदोबस्तासाठी खर्ची पडतो.
गडकोट परिसरात सुरक्षाव्यवस्था नाही. भाविकांना पायरीमार्गावर पथारीवाले विक्रेते यांचा सामना करावा लागतो. गडावर जाण्या-येण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत मात्र तिथे सुरक्षारक्षकाचा अभाव आहे. मेटल डिटेक्टर यंत्रणाही कार्यान्वित नाही. गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होणार नाही. भाविकांना सुरक्षितपणे आत व बाहेर जाता यावे यासाठी देवसंस्थानच्या सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देण्याचीही गरज आहे. मात्र, याबाबत देवसंस्थानकडून अजूनही कोणतीही उपाययोजना झालेली नाही.
मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसे सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. गडावर जाण्या-येण्याचे वेगवेगळे मार्ग, दिशादर्शक फलक, झटपट दर्शन, दर्शनरांगेचे नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन इ. बाबी आता ऐरणीवर आल्या आहेत.
(वार्ताहर)
४देवसंस्थानवर कार्यरत असलेल्या सात विश्वस्तांपैकी एका महिला विश्वस्ताने आपला राजीनामा धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला आहे. इतर चार विश्वस्तांनी प्रमुख विश्वस्तांवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. तसे पत्रही तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे दिल्याचे समजते. एकूणच अंतर्गत बंडाळ्या व कुरघोडीच्या राजकारणाने सध्या देवसंस्थान विश्वस्त मंडळ ग्रासले आहे.
४पायरीमार्गावरील वेशी, दीपमाळा, ओवऱ्या, सज्जा, मुख्यमंदिर, सभामंडप यांच्या डागडुजी व दुरुस्तीच्या विकासकामांची अत्यंत आवश्यकता आहे. गर्दीच्या वेळी दगडीकामाचा एखादा दगड अथवा चिरा निसटल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.