मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष
By अजित घस्ते | Published: May 14, 2023 05:55 PM2023-05-14T17:55:01+5:302023-05-14T17:55:29+5:30
मार्केटयार्डात शेतमाल चोर्यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात
पुणे : मार्केटयार्डातील फळे-भाजीपाला, गुळ भुसार बाजारात चोर्यांचे प्रमाण वाढले असून दररोज शेतमालाच्या चोर्या होत आहेत. शनिवारी मार्केटयार्ड बंद असते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री च्या सुमारास अक्षरशः आंबे पेटी चोरून नेली. अशा चोरीच्या घटना मार्केट यार्ड आवाजात वारंवार घडत आहेत. याचा फटका शेतकरी, आडत्यांना बसत आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील सुरक्षेतिचा प्रश्न ऐरणीवर असून सध्या येथील सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. त्यामुळे येथील सुरक्षा रक्षक वाढवून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्या सुरक्षितेसाठी आता निवडून आलेल्या संचालकांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
मार्केटयार्डात शेतमाल चोर्यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात. आता नजीकच्या काळात गुळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली गेली. त्यापैकी एका दुकानातुन सुमारे ३० हजार रूपयांची तर, दुस-या दुकानातून तीन लाखांची चोरी झाली होती. गेल्या आठ दिवसापुर्वी पान शॉप फोडून ५० ते ६० हजार रोख रक्कमसह मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत संबंधितांनी पोलीसांत तक्रारी दिल्या आहेत. दुसरीकडे फळे भाजीपाला बाजारात गाळ्यांवरून भाजीपाल्यासह आंबा, सफरचंदाच्या पेट्यांच्या पेट्या लंपास केल्या जात आहेत. बाजारात दररोज वाहतुककोंडी होत असताना बाजारातील सुरक्षा रक्षक जागेवर नसतात. मात्र, मेस्को कर्मचार्यांकडे हजेरीपुरते वेळेवर असतात की काय असा प्रश्न उपस्थित गेला जात आहे. त्यामुळे मार्केटयार्ड बाजार आवारातील सुरक्षा व्यवस्था सुधारणा का? असा प्रश्न बाजार घटकांना पडत आहे.
''बाजारात चोर्या वाढल्या असून चोर्या करणार्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरेत स्पष्ट दिसतात. चोरांच्या दहशतीमुळे कोणही कारवाई करत नाही. चोरी केलेला शेतमाल गेटच्या बाहेर नेताना सुरक्षा रक्षक त्यांना हटकत नाही. सध्या एका आंब्याची पेटी चार ते पाच हजार रूपयांची आहे. यामध्ये शेतकरी आणि आडत्यांचे नुकसान होत आहे. मोठा खर्च करूनही बाजाराची सुरक्षा उपयोगाची आहे का असा प्रश्न पडतो. - युवराज काची, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन.''
''बाजारातील चोर्यांच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रात्रीची गस्तीसाठी फिरते वाहन ठेवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील. - डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे.''