सिंहगडावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:39+5:302021-03-18T04:12:39+5:30
पुणे : सिंहगड किल्ल्यावर १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली. तब्बल एक कोटी रुपयांच्या ...
पुणे : सिंहगड किल्ल्यावर १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली. तब्बल एक कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, हा ध्वज कायमस्वरूपी फडकण्याकरिता उपाययोजना करणार असल्याचे प्रशासनाकडून सभेमध्ये सांगण्यात आले.
पालिकेकडे आमदार भीमराव तापकीर यांनी सिंहगडावर भगवा ध्वज उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच ध्वजासाठी एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिलेली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सभेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला होता. एक कोटी रुपयांच्या निधीमधून सुमारे ३० मीटर उंचीचा (फाऊंडेशन धरून सुमारे १०० फूट) ध्वज उभारणे, ध्वजस्तंभ उभारण्यासाठी फाऊंडेशन उभारणे, विद्युत प्रकाश व्यवस्था, आवश्यक सुशोभीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत.
या वेळी चर्चा सुरू असताना मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील तिरंगा ध्वज का फडकत नाही, असा प्रश्न विचारला. त्या वेळी वाऱ्याच्या वेगामुळे ध्वज फाटत असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले. त्यावर नगरसेवकांनी जर कात्रजला वाऱ्यामुळे ध्वज फाटत असेल तर सिंहगडावर फाटणार नाही का, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जुजबी उत्तर देऊन वेळ मारुन नेली.
या वेळी नगरसेवक वसंत मोरे यांनी सिंहगडावर कायमस्वरुपी ध्वज कायमस्वरुपी फडकला नाही, तर ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना झेंड्याला उलटे लटकाविण्याचा इशारा दिला.