सहकारनगरला दरड कोसळली; मुले खेळत नव्हती म्हणून टळला अनर्थ, ४ दुचाकी अडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:55 AM2024-06-14T10:55:49+5:302024-06-14T10:58:07+5:30
दरड कोसळलेल्या भागात दररोज सायंकाळी मुले खेळत असतात, सुदैवाने गुरुवारी तेथे कोणीही आले नव्हते म्हणून माेठा अनर्थ टळला
पुणे: शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे टेकड्यांवरून माती वाहून आली आहे. त्यानंतर दरड पडण्याचा धोका वाढला आहे. त्यातच सहकारनगर क्रमांक दोन येथे क्षितिज सोसायटीच्या आवारात दरड कोसळून त्याखाली चार दुचाकी अडकल्या आहेत. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
धनकवडी भागातील चव्हाणनगर येथेही दरड पडण्याचा धोका असल्याचे पत्र प्रशासनाला दिलेले असताना सहकारनगर क्रमांक दोनमध्ये दरड पडून दुचाकींचे नुकसान झाले. या भागात दररोज सायंकाळी मुले खेळत असतात. सुदैवाने गुरुवारी तेथे कोणीही आले नव्हते म्हणून माेठा अनर्थ टळला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी या डोंगरात झिरपल्याने खडक मोकळा होऊन दरड पडली असल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नितीन कदम, माजी नगरसेवक महेश बावळे, महापालिकेचे अधिकारी राजेश बनकर, उमेश शिदुक, वनविभागाचे प्रदीप संकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा डोंगर सोसायट्यांना लागून आहे. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरडी काढण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेऊन तातडीने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नितीन कदम आणि महेश वाबळे यांनी केली.
क्षितिज सोसायटीच्या मागच्या भागात गुरुवारी दरड कोसळली असून, राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. - राजेश बनकर, महापालिका अधिकारी