साहेब, चला आपण पोलिसांत जाऊ
By admin | Published: April 23, 2016 12:46 AM2016-04-23T00:46:51+5:302016-04-23T00:46:51+5:30
‘साहेब, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. गेल्या ६ दिवसांपासून आम्हाला प्यायला पाणी नाही. पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा पाईपलाईनमधून होणारी पाणीचोरी थांबविणे आवश्यक आहे
बारामती : ‘‘साहेब, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. गेल्या ६ दिवसांपासून आम्हाला प्यायला पाणी नाही. पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा पाईपलाईनमधून होणारी पाणीचोरी थांबविणे आवश्यक आहे. पोलिसांना कारवाई करण्याची विनंती करू,’’ असे साकडे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के.आगवणे यांना एमआयडीसीतील उद्योजकांनी घातले.
येथील एमआयडीसीला ५ दिवसांपासून उजनी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. सध्या उजनी जलाशयातून पाणी खाली सोडल्यामुळे जलाशयातील पाणीपातळी खालावली आहे. परिणामी, पाणीपुरवठा थांबला आहे. मात्र, पाणीचोरीमुळेच उद्योजकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, बारामती चेंबर
आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दत्ता कुंभार, उद्योजक शहाजी
रणनवरे, सुनील गोळे, राजन नायर, बापू बाबरे आदींनी आगवणे यांच्या केबिनमध्ये शुक्रवारी (दि. २२) धाव घेतली.
या वेळी पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी आगवणे यांना पोलीस ठाण्यात चला, असा आग्रह धरला. सहा दिवसांपासून एमआयडीसीतील ‘रेसिडेन्शियल झोन’ पाण्यापासून वंचित आहे. या भागात पाण्याचे टँकर सुरू करा, असे साकडे घातले. यावर आगवणे यांनी एमआयडीसीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तरतूद नसल्याचे कारण सांगितले. त्यावर उद्योजकांनी टँकरसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरही आगवणे यांची नकारघंटा कायम होती.
तसेच, पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. उपअभियंता नखाते त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थांबून असल्याचे त्यांनी या उद्योजकांना सांगितले.
या वेळी पाणीप्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करून उद्योजक बाहेर पडले. त्यानंतर कार्याध्यक्ष कुंभार, सुनील गोळे, राजन नायर, अरुण म्हसवडे यांनी थेट उजनी जलाशय गाठला. येथील कामांची या उद्योजकांनी पाहणी केली. भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर यादव यांची सायंकाळी उशिरा भेट घेणार असल्याचे कुंभार यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)