साहेब, एकाकडेच तीन रेशनिंग दुकाने

By admin | Published: March 17, 2016 03:06 AM2016-03-17T03:06:22+5:302016-03-17T03:06:22+5:30

‘‘साहेब, एकाच माणसाकडे तीन तीन रेशनिंगची दुकाने आहेत. चार-चार महिने धान्य देत नाय... माझं काय कोण करू शकत नाय... अशी दमदाटी करतो... तुम्ही तरी न्याय द्या...’’

Saheb, one of the three rationing shops | साहेब, एकाकडेच तीन रेशनिंग दुकाने

साहेब, एकाकडेच तीन रेशनिंग दुकाने

Next

बारामती : ‘‘साहेब, एकाच माणसाकडे तीन तीन रेशनिंगची दुकाने आहेत. चार-चार महिने धान्य देत नाय... माझं काय कोण करू शकत नाय... अशी दमदाटी करतो... तुम्ही तरी न्याय द्या...’’ रेशनिंगच्या धान्यासाठी शिरष्णे गावातील पिंगळेवस्ती (ता. बारामती) वरील ग्रामस्थांनी बुधवारी थेट बारामती गाठली. त्यांच्याव्यथा ऐकल्यानंतर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला, तर अन्य दोन दुकानांना टाळे ठोकण्यात आले.
धान्यपुरवठा अनियमित होतो. त्याची तक्रार केली तर तहसील कार्यालयातूनच तक्रारदाराचे नाव त्याला सांगितले जाते. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा त्या ग्रामस्थाला अरेरावी केली जाते, अशा तक्रारींचा पाढाच त्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर वाचला. पांढरेवाडी, शिरष्णे, पिंगळेवस्ती या तीन ठिकाणची स्वस्त धान्य दुकाने एकाच व्यक्तीकडे आहेत. त्याच्याकडून अनियमित धान्यपुरवठा होतो. काही मंडळींना तर चार महिन्यांपासून धान्यच दिले नाही. काहींचा मागील महिन्यातील धान्यपुरवठा झालेला नाही, तर दिलेले धान्य शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा कमी आहे. दुकानदाराच्या अरेरावीमुळे ग्रामस्थ हतबल झाले.
त्यामुळे आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांपासून ते तरुणापर्यंतची सर्व मंडळी महिलांसमवेत बारामतीला आली. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. आम्हाला कुरणेवाडीतील धान्य दुकानदाराकडून धान्य मिळावे, अशी मागणी केली.
पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला. आम्हाला धान्य मिळाले नाही तरी चालेल, परंतु, त्याचे दुकान बंद करा. लय वैताग दिलाय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही जा, माझं कोण काय करणार नाही, असा तो दुकानदार सतत म्हणतो. इकडं आम्ही उपाशी मेलो तरी चालते, पण तो काय धान्य देत नाही. त्यामुळे आम्ही न्याय मागण्यासाठी आलोय, असे ग्रामस्थ सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूदेखील होते.
कबाजी भाऊ सरक, लक्ष्मण मारुती पिंगळे, आक्का दगडे, इजाबाई सरक, सिंधूबाई सरक, मंगला होळकर, सुनंदा कोळेकर, छाया हाके, आज्याबाई माने, विठ्ठाबाई जाधव, सविता पिंगळे, रकमाबाई पिंगळे, उज्ज्वला लोखंडे, संगीता पिंगळे, सुलाबाई कोळेकर, मंगल गोफणे, नारायण बिचकुले, अनिता पिंगळे, मंगल धायगुडे, पार्वती बरकडे, सीलाबाई माने, गजराबाई हाके आदी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठले. आम्हाला धान्य पाहिजे, अशी मागणी करीत असताना सध्याच्या धान्य दुकानदाराकडून होत असलेल्या त्रासाचा पाढा त्यांनी वाचला.
महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उघडताच राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे यापूर्वी कारवाई टळली होती. आज मात्र ग्रामस्थांनी आम्हाला न्याय मिळण्यासाठी काहीही करू, अशी भूमिका घेतल्यानंतर कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)

परवाना रद्द करण्याचा यापूर्वीच प्रस्ताव...
तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले, की तक्रारीनुसार एका दुकानाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य असल्याचे आढळले. शिरष्णेच्या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामस्थांना धान्याची पर्यायी व्यवस्था होण्यासाठी कुरणेवाडी येथून तातडीने केली जाईल.
1यासंदर्भात तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले, की शिरष्णेच्या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक एस. एस. शिंदे यांनी आज पांढरेवाडी, पिंगळेवस्ती येथील दुकानांचीदेखील पाहणी केली. त्यानुसार या दोन दुकानांना सील करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
2नायब तहसीलदार विलास करे यांनी सांगितले, की सील करण्यात आलेल्या दोन्ही दुकानांचे परवाने रद्द होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ग्रामस्थांना तातडीने धान्यपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. तिन्ही दुकानांचा परवाना रद्द झाल्यावर नव्याने अध्यादेश काढून परवाने देण्यात येणार आहेत.

यापूर्वी दुकान बंद करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडून आला आहे. त्यानुसार दुकानदार शंकर खलाटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कळविले होते. मात्र, ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार तातडीने शिरष्णे येथील दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला ़
ज्योती कदम, पुरवठा अधिकारी

Web Title: Saheb, one of the three rationing shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.