साहेब, चौकीत तक्रार का नाही नोंदवीत?
By admin | Published: February 16, 2015 04:36 AM2015-02-16T04:36:10+5:302015-02-16T04:36:10+5:30
पुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्हे ठाण्यातच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकीतील अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे.
मंगश पांडे, पिंपरी
पुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्हे ठाण्यातच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकीतील अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे. हे अधिकारी आता बिनधास्त झाले असून, तक्रारदारांवर तक्रार दाखल करण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. चौकीत गेलेल्या तक्रारदाराला ठाण्यात जाण्यास सांगितल्यास तक्रारदारामध्येच पोलिसांबाबत गैरसमज निर्माण होत आहे.
रोडरोमिओंच्या छेडछाडीने त्रस्त झालेल्या भोसरीतील अश्विनी शरद वारकड या युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचा १८ जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच व्यवस्थित तक्रार नोंदवून न घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले.
याप्रकरणाची दखल घेत पुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यातच करण्याचे आदेश दिले आहेत. निगडी पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. निगडी गावठाण, आकुर्डी, रावेत, चिखली यासह ओटास्किम, कुदळवाडी या संवेदनशील भागांचा या ठाण्याच्या हद्दीत समावेश होतो. त्यासाठी या ठाण्यांतर्गत यमुनानगर, आकुर्डी, प्राधिकरण, सानेवस्ती, कुदळवाडी, रूपीनगर अशा सर्वाधिक सहा चौक्या आहेत. चिखली, कुदळवाडीपासून निगडी पोलीस ठाण्याचे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे. तक्रार द्यायची असल्यास तक्रारदाराला पाच किलोमीटर अंतरावर जावे लागते.