वंचितांचा आवाज होण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा होता प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:44+5:302021-07-11T04:09:44+5:30
पुणे : साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या काव्यातून, गीतांतून सातत्यान समाजातील वंचित शोषित गरीबांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वांना ...
पुणे : साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या काव्यातून, गीतांतून सातत्यान समाजातील वंचित शोषित गरीबांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वांना किमान दोन वेळेचे पोटभर अन्न मिळावे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी सातत्याने काव्यातून गीतांतून आवाज उठविला. त्यांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत भाष्य करावयाचे झाल्यास साहिर लुधीयानवी आर्थिक न्यायाचे उद्घोषक होते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
बलराज सहानी - साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे साहिर लुधियानवी जन्मशताब्दी निमित्त देण्यात
येणा-या पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यंदाचा साहिर लुधियानवी पुरस्कार नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि लेखक डाॅ. आशुतोष रारावीकर यांना प्रदान करण्यात आला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमाबी शेख पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या स्वलेहा एजाज हक यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थापन झालेल्या स्मशान फंड कमिटीत सक्रिय असलेले कमांड हाॅस्पिटलचे आरोग्य सेवा कामगार ज्ञानेश्र्वर माने व सुलोचना डांगे यांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर बलराज सहानी- साहिर लुधियानवी फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, शिवानी हरिश्चंद्रे , स्मशान फंड कमिटीशी संबंधित सोमेश्र्वर गणाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, साहिर लुधियानवी हे कृतीशील शायर होते. त्यांनी वेळोवेळी जाहीर भूमिका घेतल्या होत्या. ते त्यांच्या शेवटच्या काळात व्हिलचेअरवर होते. परंतु त्याही परिस्थितीत ते गरिबांच्या, स्त्रियांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले. साहिर लुधियानवी हे आर्थिक न्यायाचे समर्थक होते. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाली पाहिजे या विचारांवर त्यांचा भर होता. ऐसा मिले समाज सबको मिले अनाज हे त्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान होते.
डाॅ. आशुतोष रारावीकर, स्वलेहा एजाज हक यांनी मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर यांनी प्रास्ताविक केले तर कृपाशंकर शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.