भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड

By श्रीकिशन काळे | Published: June 15, 2024 04:06 PM2024-06-15T16:06:39+5:302024-06-15T16:07:27+5:30

सासणे यांनी दीर्घकथांसह किशोर व कुमारांसाठी मोठ्या प्रमाणावर कथा व कादंबऱ्या लिहिल्या आहेत....

Sahitya Akademi Children's Literature Award to Bharat Sasane; Selection of the book 'Samsher and Bhutbangla' | भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड

भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड

पुणे :साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठी देण्यात येणारा २०२४ सालचा बालसाहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूतबंगला' या कादंबरीला जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी बालसाहित्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. सासणे यांनी दीर्घकथांसह किशोर व कुमारांसाठी मोठ्या प्रमाणावर कथा व कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

उदगीर येथे २०२२ साली पार पडलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सासणे यांनी १९८० पासून कथा लिहिण्यास सुरवात केली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये दिसून येते. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सरकारने त्यांना गौरविले आहे. सासणे यांच्या डफ या दीर्घकथेवर प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘काळोखाच्या पारंब्या’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

या बालसाहित्याच्या पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून बालसाहित्यिक राजीव तांबे, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, विजय नगरकर यांचा समावेश होता.

याविषयी सासणे म्हणाले,‘‘साहित्य अकादमीचा पुरस्कार बाल विभागातून मिळाल्याचा आनंद झाला आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षे मी बालसाहित्य लिहित आहे. या कादंबरीतील पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून मुलांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला.’’

कुमार व किशोर मुलांसाठी विशेष पात्र निर्माण करावे, अशी इच्छा होती. निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून किशोर व कुमारवयीन मुलांना बुद्धीचातुर्य कथा सांगण्याचा प्रयत्न मी ‘समशेर आणि भुतबंगला’ कादंबरीतून केला आहे. या कादंबरीतील हे पात्र रूजले आहे, याचाही आनंद आहे. या कादंबरीतील काही भाग साधनेच्या अंकात प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे साधना अंकासाठीच काही भाग लिहिले आहेत.

- भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक

Web Title: Sahitya Akademi Children's Literature Award to Bharat Sasane; Selection of the book 'Samsher and Bhutbangla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.