संमेलनासंदर्भात साहित्य महामंडळाची 3 जानेवारीला औरंगाबादला बैठक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:53+5:302020-12-22T04:11:53+5:30
पुणे : यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय ...
पुणे : यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय साहित्य महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र आता त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या 3 जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल.
जानेवारीमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी नाशिक आणि अंमळनेर येथून आगामी संमेलनासाठी साहित्य महामंडळाकडे निमंत्रणे आली होती. सरहदने ऐन करोनाकाळात महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. या निमंत्रणावर बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र करोनामुळे परिस्थिती बदलल्याने सरहद्द वगळता दोन शहरातील संस्थांची आर्थिक तयारी आहे का, याचा विचार केला जाणार आहे.
दरम्यान, स्थळ निश्चित नसल्याने महामंडळाला शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप मिळू शकलेले नाही. शासनाकडून महामंडळाला सातत्याने विचारणा होत आहे. मात्र महामंडळाने अद्याप शासनाला संमेलनाबाबत ठोस कोणताही निर्णय कळविलेला नाही.
....
संमेलनासंदर्भातील बैठकीसाठी सदस्यांना पत्र पाठविली आहेत. संस्था आयोजनाला तयार आहेत का? संमेलन कशा पद्धतीने करायचे? निधी उपलब्ध होईल का? असे सगळे प्रश्न आहेत. संमेलनाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार केला जाईल.
-प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ
.....