साहित्य परिषद 'आपली' संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:03+5:302021-05-21T04:11:03+5:30
अनिल अवचट : मसाप जीवनगौरव पुरस्कार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वांना सामावून घेणारी, ...
अनिल अवचट : मसाप जीवनगौरव पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वांना सामावून घेणारी, आपल्या सर्वांची संस्था आहे. आपणच संस्था मोठी केली पाहिजे, हातभार लावला पाहिजे. माझा साहित्य परिषदेशी ५० वर्षांचा दृढ ऋणानुबंध आहे'', अशी भावना लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे नवीन पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मसापचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे. ''पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाधान वाटते आहे. माझ्यापेक्षाही जास्त आनंद माझ्या मित्रमंडळींना झाला आहे'', अशा भावना अवचट यांनी व्यक्त केल्या.
अनिल अवचट हे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्तò आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘अमेरिका’, ‘अक्षरांशी गप्पा’, आपले‘से’, ‘आप्त’, ‘गर्द’, ‘धागे आडवे उभे’, ‘पुण्याची अपूर्वाई’, ‘माणसं’, ‘सुनंदाला आठवताना’, ‘हमीद’ अशी त्यांची २५ हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनिल अवचट यांची ओरिगामी कलाही थक्क करणारी आहे. साहित्य अकादमीतर्फे बाल-साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
''मी 1970 सालच्या दरम्यान 'पूर्णिया' हे पुस्तक लिहिले तेव्हा मला साहित्य परिषदेत १५०-२०० रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यानंतर आजतागायत अनेक कार्यक्रमांना वक्ता, श्रोता म्हणून जाण्याचे प्रसंग आले. साहित्य परिषद मला कायमच आपलीशी वाटते.''