साहित्य परिषद ही लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:28+5:302021-05-28T04:08:28+5:30

डॉ. राजा दीक्षित : मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन पुणे : साहित्य परिषदेच्या पारंब्या आज ग्रामीण-आदिवासी भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ...

Sahitya Parishad is a cultural laboratory of public education | साहित्य परिषद ही लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा

साहित्य परिषद ही लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा

Next

डॉ. राजा दीक्षित : मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन

पुणे : साहित्य परिषदेच्या पारंब्या आज ग्रामीण-आदिवासी भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. समाजाचे मंडळीकरण झाले पाहिजे, असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणत असत. परिषदेसारख्या संस्था या एका अर्थी अशा मंडळी आणि लोकशिक्षणाच्या सांस्कृतिक प्रयोगशाळा असतात, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे परिषदेच्या ११५ व्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम होऊ शकला नाही. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते संस्थेचे आद्य प्रेरक न्या. रानडे, लोकमान्य टिळक आणि न. चि. केळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन केले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे आणि डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘आधुनिक महा राष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपला महत्त्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. तिच्या स्थापनेच्या वेळी लोकमान्य टिळक म्हणाले होते की, केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात, तर कर्ते पुरुष पुढे यावे लागतात. परिषदेचा इतिहास म्हणजे अशा कर्त्या स्त्री-पुरुषांच्या साहित्यविषयक समाजकार्याची कहाणी आहे. द. वा. पोतदार, नी. शं. नवरे आणि म. श्री. दीक्षित यांनी लिहिलेले परिषदेचे इतिहास याची साक्ष देतात. अनेक तामोयुगे पचवून मानवजात पुढे गेली आहे आणि साहित्य फुलत राहिले आहे, याचे भान आपण सतत ठेवले पाहिजे. साहित्यविश्व जेवढे सकस, सजग आणि बहुमुखी होईल, तेवढी आपली सामाजिक मानसिकता निकोप होऊ शकेल.'',

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ''कोरोना संकटाचे साहित्य क्षेत्रावरही दूरगामी परिणाम झाले आहेत. भविष्यात साहित्य संस्था, लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रितशोधक, छपाई प्रक्रियेतील सर्व घटक, ग्रंथ वितरक, ग्रंथ विक्रेते आणि साहित्य रसिक यांनी परस्परांशी सतत संवाद साधून सामूहिक प्रयत्नातून येणाऱ्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत आजवर परिषदेची वाटचाल झाली आहे. यापुढेही होत राहील.'' प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

------

मश्रींच्या आठवणींने गहिवरले राजा दीक्षित

मिलिटरी अकाउंट्समधील नोकरी सोडून साहित्य परिषदेवरील प्रेमापोटी ज्येष्ठ साहित्य सेवक म. श्री. दीक्षित परिषदेच्या कार्यालयात सेवक म्हणून रुजू झाले. ते ६७ वर्षे परिषदेशी संबंधित होते. माझा विवाह आर्थिक अडचणीमुळे मी नोंदणी पद्धतीने केला आणि जमवलेल्या रकमेतून मी आणि म. श्री. दीक्षित परिषदेचे आजीव सभासद एकाचवेळी झालो, अशी आठवण सांगताना डॉ. राजा दीक्षित गहिवरले.

Web Title: Sahitya Parishad is a cultural laboratory of public education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.