‘सह्याद्री एक्स्प्रेस’ पुन्हा ट्रॅकवर! दिवाळीनिमित्ताने एक्स्प्रेसला मिळाली गती
By अजित घस्ते | Published: November 5, 2023 04:28 PM2023-11-05T16:28:43+5:302023-11-05T16:29:38+5:30
कोरोनाकाळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली होती
पुणे : कोरोनाकाळात बंद झालेली कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद होती; परंतु प्रवाशांच्या वारंवार मागणीनुसार आता सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर ते पुणेदरम्यान शनिवारपासून पुन्हा ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात ही गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त पुणे, मुंबईत वास्तव्यास आहेत. ही गाडी बंद असल्यामुळे नाइलाजाने रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा ताण येतो. त्यातून अपघातामध्येही वाढ होऊन अनेकांना जिवास मुकावे लागते. सह्याद्री पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सह्याद्री एक्स्प्रेसला कोल्हापूर, वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, नीरा, जेजुरी, पुणे येथे थांबा देण्यात आला आहे. कोल्हापूर-पुणे गाडी नं. ०१०२४ ही ११.३० वाजता कोल्हापूरहून निघून ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. पुणे-कोल्हापूर ०१०२४ नंबरची गाडी रोज रात्री ९:४५ वाजता पुण्याहून कोल्हापूरसाठी निघेल आणि पहाटे ५:४० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर वरून पुणे याठिकाणी सरकारी कामासाठी अनेकवेळा यावे लागते. बंद असलेली सह्यादीर रेल्वे गाडी दोन वर्षानंतर पुन्हा सह्याद्री एक्स्प्रेस सुरू केल्याने प्रवासांच्या दुष्टीने सोयीचे झाले आहे. -विनोद आवळे प्रवाशी