पुण्यात साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल; पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:54 PM2022-05-19T15:54:14+5:302022-05-19T15:58:05+5:30
पुण्यातील मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि माजी अध्यक्ष वसंत मोरे यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे : पुण्यातील मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि माजी अध्यक्ष वसंत मोरे यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत दोघांनी १७ मार्चला पाण्यावरून आंदोलन केले होते. त्यावरून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दोघांना पोलीस स्टेशनला हजार राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांनी १०० ते १२५ कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन केले होते. सुरुवातीला त्यांनी प्रवेशद्वारावर आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षरक्षकाचे काहीही ना ऐकता थेट महापालिकेत प्रवेश केला. आणि पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर कार्यकर्त्यांना गोळा करून घोषणाबाजी करत आंदोलन केले. असे तक्रारदाराने शिवाजीनगरला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच...
वसंत मोरेंना अध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. पण आज दोघांना एकत्र पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरच मोरे यांनी तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच अशी पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.