संत सोपानकाकाभक्ती, पुरंदरभूषण पुरस्कार जाहीर
By admin | Published: June 10, 2017 01:56 AM2017-06-10T01:56:30+5:302017-06-10T01:56:30+5:30
येथील संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने पुरंदरच्या मातीशी नाते असलेल्या व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उल्लेखनीय
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : येथील संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने पुरंदरच्या मातीशी नाते असलेल्या व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सासवड येथील ‘वाघिरे महाविद्यालया’स पुरंदरभूषणपुरस्कार जाहीर झाला असून ‘लेप्रसी’ संस्था येवलेवाडी यांना ‘संत सोपानकाकाभक्ती’ पुरस्काराने गौरविले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने सन १९७२ मध्ये सासवड येथे विनाअनुदान तत्त्वावर हे महाविद्यालय सुरू केले. त्यांना अनेकांनी मदतीचा हातभार लावला. आज या महाविद्यालयात पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तालुक्याच्या शैक्षणिक व वैचारिक जडणघडणीत महाविद्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला आहे.
पुरंदरभूषण पुरस्कारासाठी २१ हजार रुपये रोख, सोपानकाकाभक्ती पुरस्कारासाठी १५ हजार रुपये रोख, उर्वरित पुरस्कारासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते व माजी आमदार चंदूकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्रा. नारायण टाक यांनी दिली. या वेळी निवड समिती सदस्य कुंडलिक मेमाणे, अनिल गद्रे, चंद्रकांत टिळेकर, संदीप जगताप, दत्तानाना भोंगळे, गणेश मुळीक, रवींद्रपंत जगताप उपस्थित होते.