संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:37 IST2021-07-19T17:24:12+5:302021-07-19T17:37:04+5:30
शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी
सासवड: ''माझिया वडिलाची मिरासि गा, देवा तुझी चरणसेवा बा पांडुरंगा" हा अभंग होऊन सकाळी नऊ वाजता संत सोपानकाका महाराजांच्या चल पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर श्री संत सोपान महाराजांच्या पादुका शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली तसेच रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या.
६ जुलैला समाजआरती करून चल पादूकांचा प्रस्थान सोहळा पार पडला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मंदिरातच विसावला होता. तर पालखी कालावधीतील नित्यनियम मंदिरात सुरू ठेवण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार केवळ ४० लोकच पादुका घेवून पंढरपूरकडे जाणार असल्याने त्या दृष्टीने देवस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली होती.
पालखीचा मार्ग सासवड निरा, बारामती, लासुर्णे, अकलूज, भंडी - शेगाव, वाखरी (पंढरपूर) असा एकूण १८० कि.मी चा प्रवास असणार आहे. संत सोपानदेव मंदिरात नित्यनियमाप्रमाणे पहाटे ४ वा काकडा आरती करून समाधीस महाभिषेक घालण्यात आला. मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रूपाली सरनोबत, पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी, आदी उपस्थित होते.