सयाजीराजेंचा उलगडणार जीवनपट
By Admin | Published: October 12, 2016 01:38 AM2016-10-12T01:38:09+5:302016-10-12T01:38:09+5:30
बडोद्याचे संस्थानिक सयाजीराजे गायकवाड यांचा जीवनपट लेखणीच्या रुपातून उलगडला जावा, यासाठी समग्र सयाजीराव प्रकाशन प्रकल्प
पुणे : बडोद्याचे संस्थानिक सयाजीराजे गायकवाड यांचा जीवनपट लेखणीच्या रुपातून उलगडला जावा, यासाठी समग्र सयाजीराव प्रकाशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि साहित्य संस्कृती मंडळामार्फत सयाजीराजेंचे साहित्य प्रकाशित होणार असून औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड या प्रकल्पाचे प्रमुख असतील त्यांच्यासह बाबासाहेब आंबेडकर साहित्य समिती, शाहू महाराज साहित्य समिती अशा राज्य सरकारच्या अनेक समित्यांच्या पार्श्वभूमीवर सयाजीराजे यांच्या साहित्यावर अभ्यास करणारी समिती नेमली आहे. सयाजीराजे गायकवाड यांचे साहित्य, त्यांनी तयार केलेल्या कायद्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केले होते. हा संपूर्ण इतिहास मांडण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा भांड यांनी दिली.
(प्रतिनिधी)