एका तृतीयपंथीचा संघर्ष सन्मानासाठी...
By admin | Published: February 17, 2017 04:27 AM2017-02-17T04:27:39+5:302017-02-17T04:27:39+5:30
’ते’ ही समाजाचे एक घटक आहेत. त्यांनाही मानसन्मान मिळायला हवा, पण त्यांच्या वाट्याला येते ती तुच्छतेची वागणूक.
नम्रता फडणीस/राहुल गायकवाड य पुणे
’ते’ ही समाजाचे एक घटक आहेत. त्यांनाही मानसन्मान मिळायला हवा, पण त्यांच्या वाट्याला येते ती तुच्छतेची वागणूक. त्यांचे आर्शिवाद मिळण्यासाठी शुभकार्यात त्यांना आमंत्रित तर केले जाते मात्र इतर दिवशी त्यांची सावलीही नको असते. तृतीयपंथीयांनाही इतरांसारखी सन्मानाची वागणूक मिळवून देण्याच्या संघर्षातून ताडीवाला रोड प्रभागात सुषमा विधाते या तृतीयपंथी उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्याजवळ ना पुरेसा पैसा आहे ना म्हणावे तसे मनुष्यबळ. गेल्या आठ वर्षांपासून कर्जदार-जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या महिला अध्यक्ष म्हणून केलेले सामाजिक कार्याचे संचित आणि आपल्या सतरा चेल्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीतून मिळालेले आर्थिक पाठबळ यातून निवडणूक लढविण्याच्या दिशेने त्यांनी संघर्षमयी पाऊल टाकले आहे, ते आपल्या तृतीयपंथी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी. गुरूवारी लोकमत प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत प्रचारात सहभागी होऊन त्यांचे भावविश्व जाणून घेतले .पैशाअभावी दोन दिवस त्यांचा प्रचार थांबला होता पण चेह-यावर त्याचा कुठेही लवलेश जाणवत नव्हता..लगेचच कुणालातरी महिलांना बोलावण धाडण्यास त्यांनी सांगितलं आणि दोन मिनिटात त्यांच्या चेल्यांसह आसपासच्या बायका जमा झाल्या..गळ्यात उपरण घालून घरोघरी त्या प्रचाराला जाण्यास सज्ज झाल्या..भाऊ, ताई .एकदा फक्त आम्हाला संधी देऊन बघा...असे भावनिक आवाहन त्या करीत होत्या..काही बायकांनी उपरण हातात ठेवली होती, त्यावर का लाज वाटते का आमचे उपरणं घालायची, असेही त्या ठणकावत होत्या..
आजवर एकाही पक्षाने आमचा विचार केला नाही. का ,आमची लाज वाटते का? आम्ही काय माणूस नाही का? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. आजवर स्वत:च्या हिंमतीवर मी उभे राहिले आहे, हे सांगताना त्यांच्या वाणीत दाहकता पण डोळ्यात विषण्णता दाटली होती. खूप काही सांगायचे होते. पण शब्दांमध्ये मौनाचे मळभ दाटले होते. मला पोलिस इन्पेक्टर नाहीतर डॉक्टर बनायची खूप इच्छा होती. काहीतरी बनायचे होते.
एका आॅफिसमध्ये कामासाठी गेले तर मला दहा रूपये देऊन बाहेर पाठविण्यात आले. त्यांनी माझी लायकी दाखविली की तुम्ही भीक मागूनच खा, पण भीक मागितली तर पोलिस त्रास देतात, ३९४ ची दरोडा केस पोलिसांनी टाकली..पन्नास रूपयांचा दरोडा असू शकतो का? भीकही मागून देत नाहीत आणि कामही करून देत नाही मग आम्ही जगायचे तरी कसे? असा सवाल सुषमा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (वार्ताहर)