सखे, तू रस्त्यावर उतरशील, तरच अंधाराला हरवशील!
By संजय आवटे | Published: December 16, 2023 02:28 PM2023-12-16T14:28:37+5:302023-12-16T14:29:24+5:30
सावित्रीबाई फुले तेव्हा घराबाहेर पडल्या नसत्या तर..? फातिमा शेख यांनी ही धमक दाखवली नसती तर..?...
सखे,
काळ बदलला. जग बदललं.
चूल आणि मूल एवढंच बघणारी तूही बदललीस.
शिकलीस. घराबाहेर पडलीस.
मोठ्या हिमतीनं काम करू लागलीस.
सोपा नसतो हा प्रवास.
मुलगी म्हणून वाढणं सोपं नसतं.
स्त्री म्हणून जगणंही नसतं सोपं.
एकाच वेळी किती आव्हानांवर मात करावी लागते!
रोज उठून किती आघाड्यांवर लढावे लागते!
सखे,
असा प्रवास केलास, म्हणून तू आज इथं आहेस. आणि, उद्याही तुला खूप काही करून दाखवायचं आहे. कल्पना कर. सावित्रीबाई फुले तेव्हा घराबाहेर पडल्या नसत्या तर..? फातिमा शेख यांनी ही धमक दाखवली नसती तर..? आनंदीबाई जोशी तेव्हा सातासमुद्रापार गेल्या नसत्या तर..? सावित्रीने तेव्हा शेणगोळे खाल्ले. दगडगोटे खाल्ले. म्हणून तुझा रस्ता प्रशस्त झाला. बाईनं शिकू नये, असं सांगितलं जात होतं. तिला घराबाहेर पडण्याची भीती होती. नवरा मेल्यावर तिला जिवंत जाळलं जात होतं. तेव्हा काही जणींनी हिंमत दाखवली. ती रस्त्यावर उतरली. म्हणून आज त्या वाटेनं तू चालते आहेस.
धर्म आणि जात पुरुषांना सांगू देत. तुला कसला धर्म आणि कोणती जात? सगळ्या धर्मांनी शोषणच केलं तुझं. कोणतीच जात त्यात मागं नव्हती. पण, तू खरीच हिंमतबहाद्दर. सगळ्याला पुरून उरलीस. उभी राहिलीस. रस्त्यावर उतरलीस. सगळ्यांना तुझं शरीर दिसत होतं. पण, तुझं मन कोणाला दिसलं? तुझ्यावर एवढी बंधनं लादली गेली. तुला तुरुंगात डांबलं गेलं. पण, तू फोडलास तो तुरुंग.
पण, तुरुंग पूर्णपणे उद्ध्वस्त नाही झालेला. आजही कोणीतरी कोयता घेऊन तुझ्या मागे लागतो. रात्रीच्या अंधारात फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. रात्री तू बाहेर एकटी दिसलीस, बस स्टॉपवर उभी असलीस की यांची नजर बदललीच. मग, ते सांगतात, ‘रात्रीच्या अंधारात बाहेर पडू नकोस.’ ‘सातच्या आत घरात ये.’ ‘असे कपडे घाल आणि तसे कपडे घालू नकोस.’ अंधाराचं भय दाखवून ते तुला पुन्हा पारतंत्र्यात ढकलतात. तुला घाबरवतात. मग, त्यांची हिंमत वाढते. रात्रीच्या अंधारात जे तुला असुरक्षित करतात, ते मोकाट. ज्यांच्या नजरा वाईट आहेत, ते बिनधास्त. आणि, तू मात्र तुरुंगात. काय प्रकार आहे हा?
तू जरा छान राहिलीस की यांना त्रास! थोडं मोकळेपणानं कोणाशी बोललीस तरी त्रास. तुझ्या घरी कोण आहे, तू कपडे कोणते घालतेस, तू किती वाजता परततेस, तू कोणासोबत बोलतेस याच्या चौकशा यांना. हे मात्र वाटेल ते करणार आणि चारित्र्याचं प्रमाणपत्र तुला देणार! लक्षात घे. तू जेवढी शिकशील, पुढे जाशील, तेवढे हे तुरुंग वाढणार आहेत.
सखे,
तुला तुझी ताकद दाखवावीच लागणार आहे.
ज्या अंधाराची भीती दाखवतात ना हे, त्याच अंधारावर तुला मात करायची आहे.
२२ डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र.
या रात्री तू रस्त्यावर उतरायचं. मस्त. तुला हवं तसं. तुझ्या आवडत्या कपड्यांत. तुला आवडणाऱ्या दिमाखात. अशा हजारो सख्या रात्री चालतील. कोणासाठी? स्वतःसाठी! एरव्ही जगासाठी एवढं करतेस. कधी घरच्यांसाठी, कधी नातेवाइकांसाठी. आज बाहेर पड आपली ताकद दाखवण्यासाठी. या रस्त्यावर छान सेलिब्रेशन करू. रस्त्यावर नाटक, गाणी, गप्पा, शेरोशायरी अशी धमाल असेल. आणि, तुला जे आवडतं, त्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. सख्याच मशाल पेटवतील शनिवारवाड्यावर. हा असा पहिला ऐतिहासिक सोहळा ठरेल. महिला सुरक्षेची चिंता करू नका. आम्ही सुरक्षित आहोतच. तुम्ही तुमच्या नजरा बदला, हा संदेश द्यायचाय आपल्याला. आणि हो, हा ‘नाइट वॉक’ फक्त महिलांचा असेल. सोबत चिमुकली मुलं असायला मात्र हरकत नाही.
इथं कोणी ‘सेलिब्रिटी’ नसेल. तूच खरी ‘सेलिब्रिटी’. तुझ्याच हस्ते पेटेल मशाल.
सखे,
आज या अंधारावर मात नाहीस केली, तर उद्या अंधाराची ताकद वाढत जाईल!
कशी करायची अंधारावर मात?
२२ डिसेंबरला रात्री.
रात्री १० वाजता ….जमायचे.
तिथून जायचे शनिवारवाड्यावर.
सोबत गाणी, गप्पा आणि मस्त फूड.
मशाल पेटवून सांगू अंधाराला,
आम्ही सुरक्षितच आहोत.
तुम्ही नजरा बदला.
अधिक माहितीसाठी-
संपर्क :
नम्रता : ९४२२०२०७१९
अंकिता: ७७९८१४२१६८
भाग्यश्री : ७०२८६८१७३१
नितीश : ८५५४८२६३३३
दीपक : ९९२२४१९१७४