साकुर्डे-पिंगोरी रस्त्याची आमदार संजय जगताप यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:52+5:302021-01-25T04:12:52+5:30
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या पिंगोरीच्या रस्त्याची आमदार संजय जगताप यांनी आज रविवारी (दि. २४) सकाळी पाहणी केली. ...
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या पिंगोरीच्या रस्त्याची आमदार संजय जगताप यांनी आज रविवारी (दि. २४) सकाळी पाहणी केली. लवकरच मिळणार गावाला पक्का रस्ता मिळणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी या वेळी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी गावासाठी रस्ता नसल्याने तसेच रस्त्याचे मंजूर काम होत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यानंतर आता प्रशासनाच्या वतीने मंजूर कामाची निविदा जाहीर करण्यात आली असून, लवकरच पिंगोरीकरांना पक्का रस्ता मिळणार आहे. आज पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी साकुर्डे मार्गे डोंगर रस्त्यातून मोटरसायकलवर जाऊन या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे,
महादेव शिंदे, निलेश शिंदे, दत्ताराजे शिंदे, राजेंद्र शिंदे, राजकुमार शिंदे, कैलास गायकवाड, अमोल शिंदे, रुपेश यादव, पिंगोरी पोलीस पाटील राहुल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले की, खरंतर पिंगोरीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आगोदर माझ्याशी चर्चा केली असती तर खूप बरे झाले असते, हा रस्ता पूर्वीच मंजूर होता. कोरोनामुळे या रस्त्याचे काम लांबल होतं. आता हे काम आता मार्गी लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या कामात लक्ष घालून हे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. आता थोड्याच दिवसात हे काम सुरू होऊन पिंगोरीकरांना चांगला रस्ता मिळणार आहे. त्याचबरोबर या रस्त्याचा उपयोग दर रविवारी जेजुरीमध्ये गर्दी असताना निराकडे किंवा सातारला जातांना बायपास रोड म्हणून होणार आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी काळात या रस्त्याचा वापर चांगला उपयोग होणार आहे. पिंगोरी ग्रामस्थांनी आता शासनाच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार जगताप यांनी केले. यावेळी ग्राम दैवत वाघेश्र्वरी मंदिरात झालेल्या बैठकीत प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनीसुद्धा लोकांना मार्गदर्शन केले. तसेच आघाडी सरकारच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लागत असून तालुका आता विकासाकडे झेप घेतो आहे. लोकांनी आपली कामे योग्य मार्गाने मांडून ती करून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच पिंगोरीकरांसाठी लवकरच मोबाईल टॉवर उभारला जाणार असून पुढील १५ दिवसात त्याचेही काम सुरू होणार असल्याचे दुर्गाडे म्हणाले.
पुरंदर तालुक्यातील साकुर्डे - पिंगोरी रस्त्याची आमदार संजय जगताप यांनी दुचाकीवरून रविवारी सकाळी पाहणी केली. (छाया : भरत निगडे, नीरा)