गैरहजर शिक्षकाला वेतन
By admin | Published: October 22, 2016 03:46 AM2016-10-22T03:46:43+5:302016-10-22T03:46:43+5:30
लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दोन महिन्यांपासून विनाअर्ज गैरहजर असूनही शिक्षण विभागाने त्याचे वेतन अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बारामती : लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दोन महिन्यांपासून विनाअर्ज गैरहजर असूनही शिक्षण विभागाने त्याचे वेतन अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी प्रदीप गुरव यांना विचारणा केली असता, ‘कामाच्या महासागरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले नसेल. पेमेंट काढण्याचे काम मुख्याध्यापकांचे आहे,’ असा अजब तर्क लावला.
लोखंडवाडी शाळेतील बाळासाहेब गणपत फडतरे या शिक्षकावर बारामती पंचायत समितीचा शिक्षण विभाग मेहेरबान झाला आहे. कोणतीही पूर्व परवानगी अथवा पत्रव्यवहार न करता गैरहजर असूनही या शिक्षकाला दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केल्याने फडतरे व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यांमध्ये फडतरे हा रजेसाठी अर्ज न करता तब्बल दोन महिने गैरहजर राहिला.
शाळेच्या हजेरी पत्रकावर देखील फडतरे याच्या नावासमोर गैरहजरचा शेरा आहे. तसेच वडगाव निंबाळकरच्या केंद्रप्रमुखांनी शाळेला दिलेल्या भेटी दरम्यान बाळासाहेब फडतरे हा गैरहजर असल्याचा शेरा दिला आहे. यानंतर २३ आॅगस्ट २०१६ ला फडतरे याला केवळ तोंडी आदेशाने रूजू करून घेतले. यानंतही फडतरे याला पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे वेतन मिळाले. केंद्रप्रमुखांनी व मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला फडतरे गैरहजर असल्याचे कळवले होते, तरी देखील पेमेंट कसे झाले, असे गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारले असता, ‘त्यांनी कळवले होते. मला ते मान्य आहे. मात्र कामाच्या महासागरात आमच्या ते लक्षात राहतेच असे नाही. सध्या आॅनलाईन पेमेंट होते. त्याचे पेमेंट केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी कसे काय ‘फॉरवर्ड’ केले. मुख्याध्यापकच पेमेंट करतात’ असे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतच संशय व्यक्त
होऊ लागल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी
केली सारवासारव
याबाबत गटशिक्षण अधिकारी प्रदीप गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही संबंधीत व्यक्तीवर कारवाई कराणार आहोत. त्याचे पेमेंट जमा करून घेणार आहोत. याबाबतचे परिपत्रक काढले आहे’, अशी सारवासारव केली.