वेतन ११, तर निवृत्तिवेतन ६८ हजार
By admin | Published: October 11, 2016 02:16 AM2016-10-11T02:16:55+5:302016-10-11T02:16:55+5:30
नौदलामध्ये दाखल झाल्यावर त्यांचे पहिले वेतन होते ११ रुपये. २७ वर्षे सेवा केल्यानंतर ते १९६८ मध्ये निवृत्त झाले. त्या वेळी त्यांचे निवृत्तिवेतन
पुणे : नौदलामध्ये दाखल झाल्यावर त्यांचे पहिले वेतन होते ११ रुपये. २७ वर्षे सेवा केल्यानंतर ते १९६८ मध्ये निवृत्त झाले. त्या वेळी त्यांचे निवृत्तिवेतन होते ७५० रुपये. आज ते ९० वर्षांचे आहेत. सध्या त्यांना ६८ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते. सातवा आयोग लागू झाला तर त्यांचे निवृत्तिवेतन पाऊण लाखापर्यंत असेल.
निवृत्त लेफ्टनंट कमांडर यशवंत नामजोशी यांच्या वेतन आणि निवृत्तिवेतनाची ही माहिती मिळाल्यानंतर सामान्य नोकरदारवर्गाला विस्मय वाटल्यावाचून राहत नाही. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर लष्करातर्फे दिल्या जाणाऱ्या गार्ड आॅफ आॅनरमध्येही त्यांचा समावेश होता.
नामजोशी मूळचे रत्नागिरीच्या भ्रंबाडचे. पुण्याच्या नू.म.वि. प्रशालेत नौदलात भरती असल्याचे समजल्यावर ते १९४१च्या नोव्हेंबर महिन्यात नौदलात बॉय म्हणून भरती झाले. त्यानंतर १९४३ मध्ये कराचीत प्रशिक्षणासाठी ते गेले. दीड वर्षांनी कराचीतच एचआयएमएस बहादर येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. या काळात सज्ञान झाल्यानंतर त्यांना पंजाब बोटवर नियुक्त करण्यात आले.
निवारा वृद्धाश्रमात अनेक वर्षे त्यांनी विनामोबदला काम केले. गेली २५ वर्षे ते नियमितपणे दर चतुर्थीला, ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा यांच्या घरच्या गणपतीची पूजा व आरती करतात.
नामजोशी दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना म्हणाले, ‘‘नौदलातील सेवेमुळे जीवनात एक प्रकारची नियमितता आहे. रोज अर्धा तास पायी फिरायला जातो. प्राणायाम करतो.’’