महिना ११ हजार पगार; सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या आराेग्यमित्रांची पिळवणूक, आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:23 AM2023-12-13T09:23:38+5:302023-12-13T09:23:58+5:30
आरोग्यमित्रांच्या पगारवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने, राज्यातील आराेग्यमित्रांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले
पुणे : सर्वसामान्यांचे कागदपत्रे घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना माेफत उपचार देण्यासाठी झटणारे ‘महात्मा फुले जन आराेग्य याेजने’तील ‘आराेग्यमित्र’ मात्र तुटपुंज्या पगारावर गेल्या ११ वर्षांपासून राबत आहेत. आरोग्यमित्रांच्या पगारवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने, राज्यातील आराेग्यमित्रांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले असून, त्यांच्याकडे शासन लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
आरोग्यमित्र म्हणजे या योजनेचा कणा, योजनेचा आरसा आहे. सध्या हे आराेग्यमित्र मासिक ११ हजार ४६५ रुपयांमध्ये राबतात. आयुष्मान भारत व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सध्या राबविली जात आहे. तेव्हापासून आयुष्मान कार्ड बनविण्याचे कामही आरोग्यमित्र करीत आहेत; पण ते अद्यापही दिलेले नाही. आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यासाठी अशा स्वयंसेविकांना प्रति कार्ड ८ रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र, आरोग्यमित्रांना आश्वासन देऊनही मानधनापासून वंचित राहावे लागत आहे.
आयुष्मान याेजना फुकटात राबविण्याचे धाेरण
आयुष्मान भारत योजना, आयुष्मान कार्ड केवायसीचा आदी कामे ते २०१८ पासून विनावेतन काम करीत आहेत. त्याचा मोबदला द्यावा, वेतनपटावर आल्यापासून नियुक्ती पत्रातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, ईएसआयसी पहचान कार्डमधील त्रुटी दूर कराव्यात, समान काम समान वेतन द्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वार्षिक वेतनात दरवर्षी वाढ करावी आणि मासिक वेतन किमान २५ हजार रुपये द्यावे आदी मागण्या ‘आरोग्यमित्रां’नी केल्या आहेत.
काेणीच नाही वाली
कोविड काळात कोणताही मोबदला न घेता अल्प मानधनावर ‘आरोग्यमित्रां’नी नागरिकांपर्यंत आरोग्य याेजना पाेहाेचविल्या. ‘आराेग्यमित्रां’नी काेविडमध्ये काम केले. त्याचा अतिरिक्त माेबदला न देता, तुटपुंज्या मानधनावर काम करून घेतले जात आहे. त्यांनी वेळोवेळी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना किंवा इन्शुरन्स कंपनी, टीपीए कंपनीकडे आमच्या मागण्या पोहाेचविण्याचा प्रयत्न केला; पण कुठेच आमची दाखल घेतली गेली नाही.
या आहेत प्रमुख मागण्या
- मासिक वेतन किमान पंचवीस हजार रुपये हवेत.
- आयुष्मान कार्डच्या ई-केवायसीचा मोबदला द्यावा.
- सन २०१८ पासून जॉइनिंग लेटर व कार्डचा मोबदला देण्यात यावा.
- वेतनपटावर (पे-रोलवर) आल्यापासून नियुक्तिपत्रातील त्रुटी दुरुस्ती करण्यात यावी.
- सन-२०१२ पासून डिसेंबर, २०२१ पर्यंत एक्स्टेंशन सर्टिफिकेट्स देण्यात यावे.