PMC: कंत्राटी कामगारांच्या पगाराची २,३ महिन्यांपासून ढकलगाडी सुरुचं; दिवाळीपूर्वीचं देण्याचे महापौरांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:29 PM2021-10-19T15:29:16+5:302021-10-19T15:29:24+5:30
कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शेकडो सुरक्षा रक्षकांसह, आरोग्य विभाग, कर आकारणी विभाग, आदी खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी सेवकांचे पगार दिवाळीपूर्वी अदा करावेत
पुणे : कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शेकडो सुरक्षा रक्षकांसह, आरोग्य विभाग, कर आकारणी विभाग, आदी खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी सेवकांचे पगार दिवाळीपूर्वी अदा करावेत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत महापालिका (Pune Mahanagarpalika) आयुक्तांना दिले आहेत.
महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून पगार दिला गेला नाही, याबाबत प्रशांत जगताप, वसंत मोरे, अरविंद शिंदे, सुभाष जगताप, दीपक मानकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदी नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनाला लक्ष केले. कंत्राटी सेवकांना आज पगार दिला जाईल, उद्या पगार दिला जाईल असे वारंवार सांगण्यात येते. पण, प्रत्यक्षात पगार का दिला जात नाही, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. तसेच कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सेवकांमध्ये वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्यांना कामावरून काढून टाकायचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने घेतला, असा प्रश्न यावेळी उपस्थित करून, ज्या अधिकाऱ्याने हा निर्णय घेतला तोही ४५ वर्षांपुढीलच आहे, मग त्याला कामावरून कमी करणार का, असा प्रश्न यावेळी सदस्यांनी महापौरांना केला. यावर महापौरांनी ४५ वर्षांवरील सेवकांना कामावरून कमी करण्याची अट ताबडतोब शिथिल करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले.
दरम्यान, सभागृहाला उत्तर देताना उपायुक्त माधव जगताप यांनी, कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या पूर्वीच्या ठेकेदाराकडून दीड महिन्याचे वेतन, तसेच नवीन ठेकेदाराकडून एका महिन्याचे वेतन थकले असल्याचे सांगितले़ तांत्रिक अडचणीमुळे या दोघांची बिले काढली गेली नव्हती. परंतु, स्थायी समितीने याबाबतचा ठराव नुकताच मान्य केल्याने, दोन दिवसांत संबंधितांना बिल अदा करण्यात येईल व कंत्राटी सेवकांचा पगार दिला जाईल, असे सांगितले.