राज्य सरकारने मदत केली तरच एसटी कर्मचाऱ्यांना पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:39+5:302021-05-22T04:11:39+5:30
एसटीच्या गंगाजळीत खडखडाट, ९८ हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न चिघळणार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या सार्वजनिक ...
एसटीच्या गंगाजळीत खडखडाट, ९८ हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न चिघळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या सार्वजनिक सेवेवर कडक निर्बंध आणल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील एसटी गाड्या धावत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून डिझेलचा देखील खर्च निघत नाही. एसटीचे दररोजचे २२ कोटींच्या उत्पन्न आता काही लाखांवर येऊन ठेपले आहे. यातच राज्य सरकारने २२ प्रकारच्या सवलती पोटी दिलेले १ हजार कोटी देखील संपले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळला आर्थिक मदत केली तरच मे महिन्याचे कर्मचाऱ्याचे वेतन होणार आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट होणार.
लाॅकडाऊनपूर्वी एसटीचे रोजचे उत्पन्न हे २२ कोटीचे होते. एवढे उत्पन्न असताना देखील एसटीची आर्थिक स्थिती नाजूक होती. आता तर एसटीचे उत्पन्न लाखाच्या घरात आहे. मालवाहतूक व बेस्टच्या वाहतुकीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आला. मात्र, त्यातून रोजचे होणारे नुकसान भरून येऊ शकत नाही. त्यामुळेच एसटी प्रशासनाने आता विनापरतावा राज्य सरकारकडे २ हजार कोटींची मागणी केली आहे. ती सध्या राज्य सरकारकडे विचाराधीन आहे. राज्य सरकारने ती रक्कम दिली तरच एसटी कर्मचाऱ्यांना मेचा पगार मिळणार आहे.
बॉक्स : कर्मचाऱ्यांची संख्या
पुणे विभाग : ४,२००
राज्यातील एकूण : ९८,०००
........
वेतनावर खर्च (प्रतिमहिना)
पुणे विभाग : १३ कोटी
राज्यातील एकूण : २७५ कोटी
.......
कोट :
एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे हे खरे आहे. मात्र, एसटीची कोणाकडे काही रक्कम थकलेली नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य बाबींसाठी एसटी प्रशासनाने राज्य सरकारकडे २ हजार कोटींची मागणी केली. याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
शेखर चन्ने, व्यवस्थापकिय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
.....
कोट : 2
एसटी महामंडळ हे राज्य सरकारचे अंगीकृत उपक्रम आहे. सध्या एसटीची आर्थिक स्थिती खूप बिकट आहे. अशा विपरित परिस्थितीत राज्य सरकारने आर्थिक साहाय्य करायलाच हवे.
संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे