स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकले ; कुटुंबावर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:17 PM2020-03-30T13:17:49+5:302020-03-30T13:24:23+5:30
पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : काेराेनाचे संकट देशावर असताना राेज न चुकता शहरांची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दाेन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या काळात जेवणासाठी देखील पैसे उरले नसल्याने उपाशी राहण्याची वेळ या कामगारांवर आली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने यात लक्ष घालूून कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याबाबत कारवाई करण्याची मागणी पुणे महानगरपालिका कामागार युनियनकडून करण्यात येत आहे.
काेराेनाच्या विराेधात स्वच्छता कर्मचारी देखील झडत असताना गेल्या दाेन महिन्यांचे वेतन त्यांना ठेकेदाराकडून देण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचे घर भाडे थकल्याने त्यांना घर मालकांकडून घर खाली करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यात लक्ष घालून संबंधित ठेकेदाराला सुचना देऊन कामगारांचे वेतन अदा करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कामगार युनियनचे चिटणीस वैजनाथ गायकवाड म्हणाले, प्रशासन फक्त कंत्राटी कामगारांकडून काम करण्याची अपेक्षा करत आहे मात्र दोन दोन महिन्यांचे वेतन देण्याची तसदी घेत नाही. कंत्राटी कामगारांची मुलं अक्षरशः उपाशी पोटी मरत आहेत. आम्ही त्यांच्या घरात गेल्यानंतर "लहान मुले आम्हाला खायला काहीच नाही हो आम्हाला भूक लागली हो आमच्या पप्पांना सरकार पगार का देत नाही" आम्ही कसं जगायचं! कसं शिकायचं, आम्ही मरायचं का हो काका" अशाप्रकारचे अंतःकरण पिळवटून जाणारे शब्द त्या लहान मुलांच्या तोंडून ऐकायला मिळाली. तसेच जे भाड्याने रहातात त्यांचा संसार भाडे दिले नाही म्हणून रस्त्यावर कचरा फेकावा तसा रस्त्यावर फेकून दिला आहे. उपाशी पोटी कसं जीवन जगावं असा आम्हा कंत्राटी कामगारांना प्रश्न पडला आहे. सर्वच कंत्राटी कामगारांचा पी एफ आणि ई एस आय भरणा करण्यात संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई केली जात आहे.
जर कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन वेळेत अदा केले नाही तर पुणे महानगरपालिका कामगार युनीयनच्या वतीने संबंधीत "ठेकेदार व प्रशासन यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची आहे ती आम्ही कोरोना व्हायरसचे संकट आटोक्यात आल्यानंतर करू" असा इशारा युनियनचे अध्यक्ष काॅ. उदय भट व जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.