माहितीपुस्तकांची ७०% विक्री
By Admin | Published: June 3, 2015 04:35 AM2015-06-03T04:35:59+5:302015-06-03T04:35:59+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
पिंपरी : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आॅनलाइन नोंदी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली आहे. याबाबतच्या मार्गदर्शन वर्गास पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशीपर्यंत चिंचवड- निगडी आणि पिंपरी-भोसरी या दोन विभागांतून एकूण ७० टक्के माहितीपुस्तकांची विक्री झाली.
दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारी सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील नोंदणीस दुसऱ्या दिवशीपर्यंत ७० टक्केपर्यंत माहितीपुस्तकांची विक्री झाली. पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणीची मुदत ५ जूनपर्यंत आहे. आॅनलाइन माहिती कशी भरावी आणि काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. आपआपल्या शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून माहितीपुस्तिका खरेदी केली जात आहे. त्यांची किंमत १०० रुपये आहे.
अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. पुस्तिकेमध्ये लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. शाळेत जाऊन या संदर्भातील प्रक्रिया समजावून घ्यावी. संगणकावर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्प्याने आॅनलाइन अर्ज भरावा. ‘कन्फर्म’ या बटनावर क्लिक करून अर्ज निश्चित करावा. माहितीमध्ये काही त्रुटी किंवा दुरुस्ती करावयाची असेल, तर ती कागदपत्रे शाळेकडून प्रमाणित करून घ्यावीत. सवलतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शाळेकडून प्रमाणित करून घ्यावीत, अशी माहिती मार्गदर्शन वर्गात करण्यात आली. थेट स्क्रिनवर माहिती भरण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
पिंपरीतील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य कैलास सोनवणे, आर. जी. भोसले आणि आकुर्डीतील म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य आर. पी. पोळ, के. एम. विश्वासराव यांनी मार्गदर्शन केले. पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
निकालानंतर दुसऱ्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंतीक्रम अर्ज भरावयाचा आहे. तसेच, गेल्या वर्षीचा महाविद्यालयाचे कटआॅफ गुण, मिळालेले गुण, शाखा, शुल्क, माध्यम, वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्या-येण्याची सोय आदींचा विचार करून महाविद्यालयाचा पसंतीक्रम ठरवायचा आहे. निश्चित केलेल्या पसंतीक्रमाचा प्राधान्यक्रम ठरवून कॉलेज कोड अर्जात भरावयाचा आहे. अर्ज भरताना उपलब्ध ५० पर्यायांपैकी किमान ४० पर्याय नोंदवावे लागतील.(प्रतिनिधी)