शेतमालाची मातीमोल भावात विक्री, बळीराजा मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:28+5:302021-09-05T04:14:28+5:30

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

Sale of agricultural commodities at exorbitant prices, Baliraja Metakutis | शेतमालाची मातीमोल भावात विक्री, बळीराजा मेटाकुटीस

शेतमालाची मातीमोल भावात विक्री, बळीराजा मेटाकुटीस

Next

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटो, वांगी, दोडका, मिरची, घेवडा, भेंडी, शेवगा यांचीही अवस्था अशीच बिकट आहे. बाजारभाव मिळत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील उपबाजारात विक्रीसाठी नेलेला माल पुन्हा घरी घेऊन जाणे किंवा तेथेच सोडून देऊन रिकाम्या हाताने घरी परतताना शेतकरी दिसत आहेत. भाजीपाल्याचीही अशीच अवस्था आहे. कोथिंबीर, मेथी, कांदापात, पालक, शेपू , कढीपत्ता, आळू, चवळई, चुका, चाकवत अशा भाजीपाला वर्गातील कोणत्याच भाज्यांना बाजारभाव नाही. त्याचप्रमाणे फळांची ही अवस्थाही बिकट बनली आहे. परिसरात सध्या पेरू आणि सीताफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. दर वर्षी आठशे ते बाराशे रुपयांच्या आसपास पंचवीस किलोच्या पेरूच्या कॅरेटला बाजारभाव मिळत असे. तसेच किलोवर पन्नास ते साठ रुपये प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून १०० ते ३०० रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. कधीकधी विक्री होत नसल्याने परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सीताफळाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एक हजार ते पंधराशे रुपये क्रेटला मिळणारा भाव आता तीनशे ते पाचशे रुपयांच्या आसपास आहे. या पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालात फायदा सोडाच, परंतु मुद्दलही हाती येत नसल्याने गेले दोन वर्षांपासून बळीराजा आर्थिक तोटा सहन करून शेती करत आहे. या उलट मोठी डिझेल दरवाढ झाल्याने शेती मशागतीचे दर गगनाला भिडले आहेत. खते पन्नास किलोच्या पिशवीचे दर मात्र फक्त युरिया सारखी एकदोन खते सोडली तर एक हजार ते दीड हजार रुपयांच्या पुढे, भाजीपाला बियाणे शंभर रुपये किलोच्या आसपास, भेंडी बियाणे पाच ते सहा हजार रुपये किलो, शेणखत, कोंबडीखत यांचे दर अनुक्रमे सात हजार ते पंधरा हजार रुपये ट्रेलर जोडी भरीस भर म्हणून औषधांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर शेती व्यवसाय संपुष्टात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालवणे मुश्कील बनले आहे. घर चालवण्याबरोबरच घरातील लाईटबिल विहिरींवरील, बोअरवेलवरील लाईटबिल भरणे कठीण होऊन बसले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी थकीत आहेत प्रामाणिकपणाने भरण्याची इच्छा असूनही भरता येत नसल्याने लाईट कनेक्शन तुटत आहेत. फक्त शेती व्यवसायच असा आहे की नाशवंत माल असताना हमीभाव मिळत नाही. परिणामी संपूर्ण शेती व्यवसाय तोट्यात सुरू आहे. हा शेतकऱ्यांवर सर्वांत मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. मुला-मुलींची लग्न, शिक्षण, अचानक येणारे आजारपण, कुटुंबासाठी लागणारा दैनंदिन खर्च, दर महिन्याला लागणारा गॅस सिलिंडर, लाईटबिल इत्यादी खर्च भागवायची कसा? या आर्थिक विवंचनेत शेतकरी सध्या आहेत. आणि त्याचबरोबर पुन्हा शेती उभी करण्यासाठी भांडवल आणावयाचे कोठून, तसेच काढलेले पीककर्ज भरावयाची कसे अशा एक ना अनेक चिंतानी बळीराजाला ग्रासले आहे. असे असताना कुटुंबातील एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याचे बिल भरायचे कसे? कारण उत्पन्न नसल्याने शेतकऱी कुटुंबाचा आरोग्य विमा नसल्याची वस्तुस्थिती आहे.

Web Title: Sale of agricultural commodities at exorbitant prices, Baliraja Metakutis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.