नामवंत कंपनीचे नाव वापरून बनावट मालाची विक्री; पुण्यात १ लाख २८ हजारांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 09:12 PM2020-10-01T21:12:21+5:302020-10-01T21:13:26+5:30
प्रिंटिंग मशीनसाठी बनवत होते कार्टरेज
पुणे (धायरी) : प्रिंटिंग मशीनसाठी लागणारे कार्टरेज बनवून कॅनॉन कंपनीच्या नावाने विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले आहे.
रसिकभाई बजानिया (वय :२४, मूळ रा.पाटण, गुजरात सध्या रा : जाधव नगर, वडगांव बुद्रुक, पुणे) असे सदर आरोपीचे नाव असून याप्रकरणी संजीवकुमार महेंद्र मंडल यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी बजानीया हा कॅनॉन कंपनीचे बनावट कार्टरेज बनवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सिंहगड रस्ता पोलिसांनी जाधवनगर येथील आरोपीच्या घरी छापा मारला. त्यावेळी सदर आरोपी हा बनावट कंपनीचे कार्टरेज बनवून त्याची विक्री करताना आढळून आला. दरम्यान त्याच्याजवळ १ लाख २८ हजार २७५ रुपये किंमतीचा बनावट कार्टरेज बनविण्याकरिताचा साठविलेला माल सापडला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सतीश उंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.
...........
असली व नकली मधील फरक
सध्या बाजारात बनावट पद्धतीचे कार्टरेज मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ग्राहकांनी कार्टरेज घेताना बॉक्सवर असलेल्या गोल्डन कलरच्या पट्टीवर कंपनीचे नाव 'त्रीडी' मध्ये आहे का, हे पाहूनच कार्टरेज खरेदी करावे, तसेच दुकानदारांकडे पक्क्या पावतीचा आग्रह करावा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही.