सुहाना कंपनीच्या नावे बनावट मसाल्याची विक्री; सिंहगड पोलिसांनी केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 08:58 PM2021-02-27T20:58:25+5:302021-02-27T20:59:22+5:30
सुहाना मसाला कंपनीच्या नावाचा गैरवापर
पुणे : सुहाना मसाला उत्पादक कंपनीच्या नावे बनावट मसाल्यांची विक्री केल्याप्रकरणी एका किराणा माल विक्रेत्याविरोधात सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी प्रवीण कांकरिया (वय ४५, रा. गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजयकुमार भिसे (वय ४६) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भिसे हे सुहाना मसाला कंपनीत विक्री प्रतिनिधी आहेत. कांकरिया यांचे वडगाव बुद्रुक परिसरात कांकरिया ट्रेडिंग कंपनी किराणा माल विक्रीचे दुकान आहे. कांकरिया सुहाना मसाला कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट मसाल्याच्या पाकिटांची विक्री करत असल्याची माहिती भिसे यांना मिळाली. भिसे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कांकरिया यांच्या दुकानात कारवाई करून बनावट मसाल्याची पाकिटे जप्त करण्यात आली.
कांकरिया यांच्याविरोधात कॉपी राईट अॅक्ट तसेच फसवणूक या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे तपास करत आहेत.