नशेसाठी औषधांच्या ६ हजार गोळ्यांची जादा दराने विक्री; मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: July 24, 2022 04:51 PM2022-07-24T16:51:24+5:302022-07-24T16:51:33+5:30
अन्न व औषध विभागाची वाघोलीत कारवाई
पुणे : झोपेसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता न येणाऱ्या औषधाच्या ६ हजार गोळ्या नशेसाठी जादा दराने विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याची बनावट बिले तयार करुन शासनाची फसवणुक करणाऱ्या मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघोली येथील साई अरिहंत जनरीकचे महावीर मनसुखलाल देसरडा (वय ३४) व त्यांच्याकडून औषध खरेदी करणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे औषध निरीक्षक असून त्यांनी वाघोली येथील साई अरिहंत जनरीक याच्याकडे जाऊन तपासणी केली. त्यांना अल्प्रेक्स या औषधाच्या ६ हजार गोळ्या अज्ञात लोकांना वाढीव किंमतीला विक्री केल्याचे आढळून आले. बीडमधील न्यू विहान मेडिकल यांच्या नावे बनावट बिले तयार केली. शासकीय अधिकार्यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अल्प्रेक्स या गोळ्या अतिशय स्वस्त असून ती प्रामुख्याने मानसिक आरोग्य, चिंता यासाठी डॉक्टरांकडून दिली जाते. तिचा गैरवापर हा नशेसाठी होत असतो. त्यातूनच अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अधिक किंमतीला विक्री केल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त पाटील यांनी सांगितले की, कोणाला झोप येत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिल्या जातात. किंवा शस्त्रक्रियेनंतर झोप येत नसेल तर त्यांचा वापर केला जातो. त्याचा गैरवापर नशा करण्यासाठी केला जाताना दिसून आला आहे. आम्ही अशी यापूर्वीही कारवाई केली आहे.